मावळचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार कृष्णराव भेगडे यांचे मामा लहू शेलार यांच्या हत्येचा कट मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने उधळला असून छोटा शकील टोळीतील तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे शेलार यांचे राजकीय विरोधक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अमिन शेख यांनीच ही सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.
कृष्णराव भेगडे हे नुकतेच मावळ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. यामुळे येथील काँग्रेसचा माजी नगरसेवक अमिन मेहबूब शेख (४८) याने भेगडे यांचे मामा लहू शेलार (४८) यांच्या हत्येचा कट रचला. शेलार हे शेख यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मुंब्रा येथील मोहम्मद हुसेन अजीज शेख (४०) आणि गणेश भिल्लारे (४८) या छोटा शकीलच्या दोन गुंडांना अमिनने हत्येची सुपारी दिली. या कटाची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली. सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे आणि नितीन पाटील यांनी पुण्यातील हवेली तालुक्यातील देहू रोड येथे सापळा लावून हुसेन शेख आणि गणेश भिल्लारे यांच्यासह अमिन शेख याला अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, चॉपर, मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. अमिन शेख हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्षही आहे. त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न आदी २३ गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे. हत्येची सुपारी घेणाऱ्या भिल्लारे आणि हुसेन शेख छोटा शकील टोळीचे गुंड असून त्यांच्यावरही हत्येचे गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.