शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘रात्रजीवन’ योजनेला मित्र पक्ष भाजप तसेच काँग्रेसने विरोध केला असला तरी आपले एकेकाळचे गुरू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने मांडलेल्या या कल्पनेचे छगन भुजबळ यांनी समर्थन करताच शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून त्याचे बुधवारी विधानसभेत स्वागत केले.
 चर्चेच्या सुरुवातीलाच भाजपचे राज पुरोहित यांनी, मुंबईला रात्रजीवनाची आवश्यकता नाही, असे ठणकावून सांगितले. काही जणांच्या या मागणीमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या घराच्या खाली रात्रभर धांगडधिंगा सुरू राहील, अशी नागरिकांमध्ये काळजी आहे. रात्रजीवनात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शंका पुरोहित यांनी व्यक्त केली. रात्रजीवनाची मागणी करणाऱ्यांना महिलांच्या प्रसाधनगृहांचा प्रश्न सोडविण्याची कधी आठवण कशी झाली नाही, असा सवाल वर्षां गायकवाड (काँग्रेस) यांनी केला. मुंबईकरांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, पाणी या समस्या आधी सोडवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही रात्रजीवनाच्या योजनेस विरोध केला. युतीचे सरकार फक्त धनिकांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.
शिवसेनेच्या कोणत्याही योजनेस भुजबळांचा विरोध हे गेले २५ वर्षांंचे जणू काही समीकरणच तयार झालेले. पण आदित्य ठाकरे यांच्या या योजनेस होणाऱ्या विरोधाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कोणत्याही विषयावर चर्चा व्हायला काहीच हरकत नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. लोकांना त्रास होणार नाही असा तोडगा निघेल का, याचा विचार झाला पाहिजे. विरोधाला विरोध करण्यापेक्षा चर्चा होऊ द्यावी, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडताच शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून या सूचनेचे स्वागत केले.