युती तुटल्यापासून संपूर्ण प्रचारभर प्रामुख्याने भाजपवरच टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी, मतदानाच्या पूर्वसंध्येला ‘भाजपच शिवसेनेचा खरा शत्रू’ असल्याचे कबूल केले. ‘चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मीही मुख्यमंत्री होणारच,’ असे सांगत त्यांनी स्वत:च्या मुख्यमंत्रिपदाची महत्त्वकांक्षा जाहीर करताना मोदींनाही हिणवले. ‘सामना’ या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी केलेल्या या विधानावरून भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच, रात्री उशिरा उद्धव यांनी घुमजाव करत विधानातील ‘चहावाला’ शब्द वगळला.
विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. तसेच पक्षाच्या मुखपत्रातील संपादकीयमधूनही भाजपविरोधी सूर उमटत होता. याच पाश्र्वभूमीवर, ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी भाजविरोधी भूमिकाच तीव्रतेने मांडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेतील अनेकांची इच्छा होती. पण ‘मी मुख्यमंत्री होणार’, हे त्यांनी स्वत: जाहीर केले नव्हते. मतदानाच्या आदल्या दिवशी मात्र त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून घोषित करताना मोदी यांनाच लक्ष्य केले. ‘गेली २५ वर्षे भाजपबरोबर युतीमध्ये एकत्र राहिलो, अनेक जय-पराजय पाहिले. त्यांच्यासोबतची युती तुटल्याचे दु:ख जरूर आहे. पण मी भाजपला शरण गेलो नाही,’ असे ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटल्याचे समजते. युती तुटल्यानंतर भाजपविषयी कडवट भूमिका घेणाऱ्या ठाकरे यांनी आता तर भाजप हाच एकमेव शत्रू असल्याचे म्हटले. पण त्याचबरोबर, ‘चहावाला पंतप्रधान होत असेल, तर मीही मुख्यमंत्री होणारच’ असेही ते म्हणाले. त्यांच्या या मुलाखतीबाबतचे वृत्त माध्यमांतून झळकल्यानंतर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
ठाकरे यांनी प्रचारातील खालची पातळी गाठली असून त्याला उत्तर दिले पाहिजे, असा आग्रही सूर भाजपच्या प्रदेश कार्यालयात उमटत होता. त्यामुळे, रात्री उशिरा उद्धव यांनी मोदींबाबतच्या ‘चहावाला’ या उल्लेखाऐवजी ‘एक सामान्य माणूस’ हा शब्द मुलाखतीत टाकण्याच्या सूचना दिल्या.

भाजपमध्ये प्रचंड नाराजी
शिवशाहीचे बाळासाहेबांचे स्वप्न, मराठी अस्मिता, दिल्लीपुढे झुकणार नाही, अफझलखानाच्या फौजा, दिल्ली की बिल्ली, अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रचारादरम्यान मोदी यांच्यावर टीका सुरू केली होती. मात्र सेनेच्या आरोपांवर प्रतिक्रिया द्यायची नाही, असा पवित्रा भाजपने घेतला होता. आता मात्र चहावाला पंतप्रधान होतो, तर मी मुख्यमंत्री का नाही, या ठाकरे यांच्या विधानानंतर भाजपमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिवसेनेला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल, असे आता भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

‘सामान्य माणसाची ताकद मोठी आहे. त्यामुळे मोदींसारखा चहाविक्रेता पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे त्याने ठरवले तर उद्धवजी मुख्यमंत्री होऊ शकतील. आम्हाला हे सांगायचे आहे. वृत्तवाहिन्यांनी चुकीचे दाखवले व विधानाचा सूरही बदलला.’
संजय राऊत, शिवसेना नेते.