नाशिक-नगरमधील पाणी मराठवाडय़ात सोडण्यावरून सुरू झालेल्या वादामागे भाजपने पद्धतशीरपणे कुरघोडीचे राजकारण केले असून, मराठवाडय़ात पक्षाची ताकद वाढविण्याकरिता पाण्याचा मुद्दा हाती घेतला आहे.
नाशिक व नगर जिल्ह्णाातील पाणी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात सोडण्यात यावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. संगमनेरमध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलन करण्यात आले. तसेच आज बंदही पाळण्यात आला. नगर जिल्ह्णाात अन्यत्रही आंदोलन सुरू झाले आहे. मराठवाडय़ाला पाणी सोडल्याने नगर जिल्ह्णाातील शेतीचे नुकसान होईल, असा दावा थोरात यांनी केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार मराठवाडय़ात पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार होते. पण साडेबारा टीएमसी पाणी सोडून सरकारने नगर व नाशिक जिल्ह्णाातील नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. विदर्भाबरोबरच मराठवाडय़ात भाजपची ताकद वाढविण्याचा नेतेमंडळींचा प्रयत्न आहे. यातूनच दुष्काळग्रस्त मराठवाडय़ासाठी पाणी सोडण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी मराठवाडय़ात पाणी सोडल्याचा चांगला संदेश जाईल, हे भाजपचे गणित आहे. यातूनच सरकारमधील उच्चपदस्थांच्या सूचनेनुसारच पाणी सोडण्यात आल्याचे समजते.