ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक यांचा ऐनवेळी योजनेत समावेश; विरोधकांचा आरोप

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरी भागातील मतदारांना खूश करण्यासाठी भाजप सरकारने ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांना स्मार्ट सिटीचे गाजर दाखविल्याची चर्चा मंत्रालयात ऐकावयास मिळत आहे. केंद्र सरकारच्या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत आतापर्यंत राज्यातील सात शहरांचा समावेश झाला आहे. मात्र पहिल्या टप्यातील पुणे आणि सोलापूर या दोन्ही शहरांच्या स्मार्ट योजना अजूनही कागदावर असून त्यासाठी सरकारने दिलेला प्रत्येकी २८६ कोटींचा निधीही पडून असल्याचे समोर आले आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांत देशात १०० स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. आतापर्यत तीन टप्यात ६० शहरांची या योजनेमध्ये निवड झाली आहे. त्यात राज्यातील पहिल्या टप्यात पुणे, सोलापूर तर तिसऱ्या टप्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांचा समावेश झाला आहे. पुणे आणि सोलापूर या दोन्ही महापालिकांना स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी आतापर्यंत प्रत्येकी २८६ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र सहा महिन्यांनतरही या निधीचा विनियोग महापालिकांनी केलेला दिसत नसून बहुतांश स्मार्ट योजना आजही कागदावरच असल्याची कबूली मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या दोन्ही शहरांमधील योजना मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतांनाच आता पाच नव्या शहरांचा या योजनेत समावेश झाला आहे. मात्र पहिल्या दोन टप्यात मागे राहिलेल्या या पाचही शहरांनी गेल्या काही महिन्यात फारसे काही प्रयत्न केले नसतानाही त्यांचा स्मार्ट योजनेत समावेश झाल्याने मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळातही उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

मंत्रालयातील चर्चा

  • केवळ निवडणुकांसाठीच या चार शहरांची निवड करण्यात आल्याचा राजकीय आरोप होण्याची शक्यता अगोदरच गृहित धरून तसेच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून कल्याण-डोंबिवलीचाही या योजनेत समावेश करण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

केवळ महापालिका निवडणुका डोळ्यामोर ठेवून भाजपने ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला असून २०० कोटीत या महापालिका कशा स्मार्ट होणार?

– सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते