महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची ‘भाजप’ची तयारी सुरु असून मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी पावले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विविध यंत्रणांना दिले. विदर्भातील सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी तीन प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमच्या माध्यमातून आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘वॉररुम’ची बैठक झाली. एमएमआरडीए, महापालिका, सिडको, नगरविकास विभाग व अन्य यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी त्यास उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळासाठी कालबध्द पावले टाकली जात असून मार्चपर्यंत निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो- तीन मार्गास मोठा विरोध होत असला तरी कामे मेपर्यंत सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दहिसर ते डीएननगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या उन्नत मार्गाच्या कामाचे आदेशही मार्चपर्यंत जारी व्हायला हवेत, असे त्यांनी संबंधितांना सांगितले.
शिवडी-न्हावाशेवा सीलिंक प्रकल्प हा अतिशय महत्वाचा असून त्याचे भूमीपूजन ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महापालिका निवडणुकीची घोषणा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने त्यानंतर आचारसंहितेमध्ये मुंबईतील प्रकल्प अडकू शकतात. त्यापूर्वी निविदा प्रक्रिया आणि कामाचे आदेश व भूमीपूजने झाली, तर त्याचा राजकीय लाभ भाजपला उठविता येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वॉररुमच्या माध्यमातून या प्रकल्पांना गती देण्यासाठी पावले टाकली आहेत.
विदर्भातील महत्वाच्या गोसीखुर्द, निम्नवर्धा व बेंबळा या प्रकल्पांचा समावेश आता वॉररुममध्ये करण्यात आला आहे. हे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे व जलसंपदा विभागाकडे मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमकडून आता पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करुन घेतली जाणार नसून ती थेट खरेदीने घेण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मोबदला मिळणार आहे.