संघर्ष यात्रेला उत्तर देण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘संवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ देशभरात राबविली जाणार असून महाराष्ट्रात तिला ‘संवाद यात्रा’ म्हणून स्वरूप दिले जाणार आहे. त्यामुळे भाजपने ही मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विरोधकांच्या संघर्ष यात्रेला काही भागांत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मुद्दय़ावर असंतोष असून कर्जमाफी होईल, या आशेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी हप्तेही भरलेले नाहीत. केवळ बँकांना लाभदायक अशी सरसकट कर्जमाफी तूर्तास करायची नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या घेतली आहे. त्याविरोधात विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेऊन भाजपकडून आता ‘संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे.

राज्यात ९० हजार निवडणूक मतदान केंद्रे (बूथ) असून प्रत्येक बूथची जबाबदारी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांकडे सोपविली जाणार आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना’ राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात ती ‘संवाद यात्रा’ रूपाने काढली जाणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागात शेतीविषयक योजना, सरकारने केलेले प्रयत्न आणि अन्य मुद्दे मांडले जातील. तर शहरी भागातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय आणि योजना जनतेपर्यंत पोचविल्या जातील, असे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ही यात्रा जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून दोन आठवडे काढली जाईल. त्याचा तपशील ठरविण्यात येत असून लहानमोठय़ा सभा व अन्य माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाईल.

..तर निवडणूक बरी?

शिवसेनेकडून सतावणूक होत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकीची चाचपणी सुरू केली होती. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास अन्य पक्षांमध्ये फोडाफोडी करून आमदारांना भाजपमध्ये घ्यायचे आणि त्यांना पुन्हा निवडून आणायचे, यापेक्षा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यादृष्टीने ‘संवाद यात्रा’ भाजपला महत्त्वाची आहे. मध्यावधी निवडणुका झाल्या नाहीत, तरी २०१९च्या निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही त्याचा उपयोग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपचा जनतेशी संवाद नाही -अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला ग्रामीण भागांमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळेच सत्ताधारी भाजपने धसका घेतला असून, त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद यात्रा काढण्याचे जाहीर केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यातील जनतेशी भाजपचा संवादच राहिलेला नाही. पायाखालची वाळू घसरू लागल्याने विसंवादी सरकारचा आता जनतेसमोर रडगाणे गाण्याचा केवीलवाणा प्रयत्न असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.