नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचा निकाल म्हणजे भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत आहेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. ते गुरूवारी नांदेड महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल नांदेडकरांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. या निवडणुकीत भाजपचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. भाजपने निवडणुकीसाठी आक्रमक प्रचार मोहीम राबविली. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभाही घेतली. पक्षाचे बडे नेते अनेक दिवस नांदेडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, नांदेडकर भाजपच्या भपकेबाज प्रचाराला बळी पडले नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांना भुलले नाहीत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणावर उमेदवार आयात केले होते. यापूर्वी राज्यभरातील अनेक निवडणुकांमध्ये भाजपने नगरसेवक आणि आमदार फोडण्याची नीती वापरली होती. मात्र, नांदेडमध्ये फोडाफोडी करून भाजपमध्ये आणलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला विराम मिळेल. काँग्रेस पक्षासाठी हे खूप मोठे यश आहे. मुख्य म्हणजे नांदेडमधील हे निकाल महाराष्ट्रातून आणि देशातून भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात ठरेल, असे चव्हाण यांनी सांगितले.

नांदेडमधील विजयातून अशोक चव्हाणांचे नारायण राणेंना चोख प्रत्युत्तर

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. काँग्रेसने ७१ जागांवर विजय मिळवला असून भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. तर तीन जागांची मोजणी सुरु आहे. एमआयएमचा काँग्रेसला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, या निकालावरून नादेंडकरांनी एमआयएमलाही नाकारल्याचे दिसते. एमआयएम, राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांनी नांदेडमध्ये ‘अशोकपर्व’च असल्याचे दाखवून देत भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम घातला आहे.

विकास ‘पोट फाडून’ जिंकला; आता सांगा वेडे कोण?; भांडुपमधील विजयानंतर शेलारांची प्रतिक्रिया