आंबेडकरी जनतेचा अपमान केल्याची भाजपची टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकारने निमंत्रण देऊनही ते अहंकारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहिले नसावेत. त्यामुळे त्यांनी आंबेडकरी जनतेचा व विचारांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये, असा इशाराही दिला. पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला घरी जेवायला बोलावणे, मुखपत्र ‘सामना’मध्ये त्याची जाहिरात छापली आणि राऊत स्वत: दोन वेळा पाकिस्तानला जाऊन आले, हे कसे चालते, असे प्रश्न भाजपने केले आहेत.

शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केल्यावर भाजपनेही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रभक्ती हाच भाजपचा मूळ गाभा असून संस्थापक अध्यक्षांनी काश्मीरसाठी बलिदान दिले. काश्मीरमध्ये राष्ट्रध्वज फडकाविण्यासाठी केलेल्या आंदोलनात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रभक्ती शिकवू नये. वृत्तपत्रीय  लिखाण वा प्रसिद्धीमाध्यमांमधून भूमिका मांडणे, म्हणजे राष्ट्रभक्ती नाही, असा टोला मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला आहे. ठाकरे यांनी मियाँदादला घरी जेवायला बोलावणे कसे चालते, म्हणजे ‘मातोश्री’वर जाऊन लोटांगण घालणारे चालतात आणि अन्य का चालत नाहीत, असे टीकास्त्र भाजप प्रवक्ते राम कदम यांनी सोडले आहे. इंदू मिलच्या कार्यक्रमाचा विषय ठाकरे यांनी उगाच प्रतिष्ठेचा केला. त्यांना ज्येष्ठ मंत्र्यांनी निमंत्रण देऊनही ते आले नाहीत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करणारी शिवसेना अजूनही बदललेली नाही, अशी टीका कदम यांनी केली.