महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधक असलेले मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती झाली. तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.
ग्रॅण्टरोड सी व डी तसेच गोरेगाव पी-दक्षिण या दोन प्रभाग समितीच्या निवडणुकीत सरिता पाटील (भाजप) व प्रमिला शिंदे (शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली. प्रभादेवी-जी दक्षिण प्रभाग समितीवर सीमा शिवलकर (मनसे) निवडून आल्या. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा दिल्याने शिवलकर निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा एका मताने पराभव केला. मालाड-पी उत्तर प्रभाग समिती निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने विनोद शेलार निवडून आले.
कांदिवली-आर दक्षिण विभागात योगेश भोईर (काँग्रेस-आय) यांनी बंडखोरी केली होती, पण भोईर यांची समजूत काढल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने नेहा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी झाल्या. बोरिवली व दहिसर-आर आणि आर-उत्तर प्रभाग समिती निवडणुकीवर मनसेने बहिष्कार टाकला होता. येथे शिवसेना-भाजप युतीच्या हंसाबेन देसाई निवडून आल्या.
अन्य प्रभाग समितीत ए, बी व ईमध्ये काँग्रेसच्या   जावेद जुनेदा      तर  एफ-दक्षिणमध्ये शिवसेनेचे     नंदकिशोर विचारे निवडून आले.