पुनर्वसनाशिवाय काम सुरू न करण्याची हमी

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. युतीमध्ये सुरू झालेल्या या श्रेयवादाचा मोठा फटका कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोला बसण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाच्या कामास होऊ लागलेल्या विरोधापुढे माघार घेत ‘आधी पुनर्वसन, मगच मेट्रो’ अशी भूमिका हा प्रकल्प राबविणाऱ्या ‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन’ला (एमएमआरसी) घ्यावी लागली आहे. एवढेच नव्हे तर महापालिका निवडणुकीपर्यंत कोणताही वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सरकारने हा प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांना दिल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

[jwplayer jPX7MVNf]

भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या कुलाबा- वांद्रे- सीप्झ मेट्रोच्या विरोधाची धार अधिक तीव्र करण्यासाठी सेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘मेट्रो- ३’वरून मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. राज्य सरकारलाही याची कल्पना असल्याने तूर्तास सबुरीने घेण्याच्या सूचना एमएमआरसीला देण्यात आली आहे. या प्रकल्पास होणारा विरोध लक्षात घेऊन एमएमआरसीलाही ‘आधी पुनर्वसन, मग प्रकल्प’ अशी भूमिका घेणे भाग पडले आहे.

विकासाचे श्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न

‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन’तर्फे ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ-मेट्रो ३’ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प उभारला जात आहे. ही मेट्रो काळबादेवी, गिरगाव, दादर भागातून जात असल्याने या भागातील लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुढे करीत सेनेने प्रकल्पास विरोध दर्शविला आहे. या मेट्रो प्रकल्पाबरोबरच अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, दहिसर ते डीएननगर, तसेच वडाळा- ठाणे- कासारवडवली प्रकल्प मार्गी लावून मुंबई आणि ठाणेकरांना खूश करून या विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे.

[jwplayer 4Ldgg0db]