गोव्यात सुभाष वेलिंगकर, मगोपशी चर्चा; गुजरातमध्ये पटेलांशी संपर्क 

महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असूनही अनेकदा भारतीय जनता पक्षाशी उघड संघर्षांची भूमिका घेणारी शिवसेना आता गोवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा गुजरात, तसेच उत्तर प्रदेश या तीनही राज्यांतील येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तोच कित्ता गिरवेल, असे स्पष्ट दिसत आहे. गोव्यातील भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर पदाधिकारी सुभाष वेलिंगकर यांच्याशी शिवसेनेने बोलणी सुरू केली असून, गुजरातमधील सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखी ठरलेला पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्याही संपर्कात सेनेचे नेतृत्व आहे. त्यामुळे या राज्यांत शिवसेना व भाजप यांच्यात राजकीय सामना रंगेल, असे चित्र आहे.

महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेना सहभागी असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने २५ वर्षे जुनी युती तोडली होती. त्याचे पक्के स्मरण असलेल्या शिवसेनेने आता अन्य राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा आणि तेथील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा, गुजरात तसेच उत्तर प्रदेश या राज्यांतील निवडणुकांसाठी शिवसेनेने तयारी सुरू केली असून भाजपविरोधात असलेल्या पक्षांसोबत युती करण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. महाराष्ट्रात भाजपने युती तोडल्याने अन्य राज्यांमध्ये भाजपऐवजी त्यांच्याविरोधात प्रबळ असलेल्या पक्षांबरोबर जाऊन भाजपला धडा शिकविण्याची शिवसेनेची रणनिती आहे.

गुजरात निवडणूक – डिसेंबर २०१७

नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपसमोर आरक्षणवादी पटेल-पाटीदार समाजाचे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानाची धार वाढवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. गुजरातमध्ये भाजपविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या हार्दिक पटेलसह पटेल-पाटीदार समाजाच्या नेत्यांशी शिवसेनेच्या नेतृत्वाने बोलणी सुरू केली असल्याचे शिवसेनेतील उच्चपदस्थांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. हार्दिकसह अनेक नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. सुरत येथे मध्यंतरी अमित शहा यांची सभा पटेल समाजाच्या कार्यकर्त्यांनी सपशेल उधळून लावली होती.

गोवा निवडणूक – फेब्रुवारी २०१७

गोव्यात भाजपविरोधात महायुती साकारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर पदाधिकारी सुभाष वेलिंगकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, शिवसेनेची साथ त्यांना मिळणार आहे. गोवा प्रजा पक्षही त्यात सहभागी होणार असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशीही (मगोप) बोलणी सुरू आहेत. यासंदर्भातील २ ऑक्टोबरच्या बैठकीआधी निर्णय अपेक्षित आहे. सुभाष वेिलगकर यांच्याशी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बोलणी केली आहेत. गोव्यात २० जागा लढविण्याचा शिवसेनेचा विचार होता; पण आता अनेक पक्षांची महायुती होत असल्यास जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑक्टोबरमध्ये गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.