पादचारी मार्गात कलादालन उभारण्याचा सेनेचा आग्रह, भाजपचे बचत गटांसाठी प्रयत्न; मात्र, प्रशासनाचा नकार

धोबीतलावमधील क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके चौकातील पादचारी भुयारी मार्गामध्ये कलादालन सुरू करून कलावंतांची मने जिंकण्याचे शिवसेनेचे मनसुभे उधळून लावत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी तेथे महिला बचत गटांना आपली उत्पादने विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची परवानगी देण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. तर भुयारी मार्गामध्ये कलादालन सुरू करण्यावर शिवसेना ठाम आहे. मात्र अग्निशमन दल आणि पालिकेच्या पूल विभागाने नकारात्मक शेरा मारल्याने निवडणुकीपूर्वी मतांच्या बेरजा करण्याचे दोन्ही पक्षांचे बेत निष्फळ ठरले आहेत.

मेट्रोसमोरील आद्य क्रांतीवीर वासुदेव वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये सात रस्ते येऊन मिळतात. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचा वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून पालिकेने येथे भुयारी मार्ग बांधला. सुरुवातीला या भुयारी मार्गाचा पादचाऱ्यांकडून फारसा वापर होत नव्हता. त्यामुळे गर्दुल्ले आणि समाजकंटकांनी भुयारी मार्गात ठाण मांडले होते. मात्र वाहतूक पोलिसांनी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अटकाव सुरू केल्यानंतर भुयारी मार्गाचा वापर वाढला. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्गामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, कलाविषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची चित्रे, शिल्पे, छायाचित्रांचे प्रदर्शन पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने या भुयारी मार्गात भरविता येईल, अशी संकल्पना चर्नीरोड येथील कला विद्या संकुलचे प्रा. मनोज सामंत यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडली होती. ठाकरे यांना ही कल्पना आवडल्याने त्यांनी पालिकेतील आपल्या पदाधिकाऱ्यांना भुयारी मार्गात कलादालन सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची सूचना केली. मात्र पालिकेने कोणताच निर्णय घेतलेला नाही.

महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या भुयारी मार्गामध्ये महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश पालिकेला दिले. हा दुसरा प्रस्ताव आल्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. एकीकडे चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील भुयारी मार्गामधील विक्रेत्यांचे गाळे बंद करण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अलवंबिले आहे. तर दुसरीकडे आता मुख्यमंत्र्यांनीच महिला बचत गटांना या भुयारी मार्गात जागा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासन संभ्रमात पडले आहे. अग्निशमन दल आणि पूल विभागाने मात्र भुयारी मार्गात अशा योजना राबविण्याबाबत नकारात्मक शेरा मारला आहे.

हा भुयारी मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठीच उभारण्यात आला आहे. त्याचे संकल्पचित्र आणि आराखडा तयार करताना केवळ पादचाऱ्यांचाच विचार करण्यात आला होता, असे पालिकेच्या पूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  तर अशा पादचारी भुयारामध्ये स्टॉल्स उभारणे योग्य ठरणार नाही. तसे करायचे झाल्यास वातानुकूलित यंत्रणेसह अन्य सुविधांचीही तेथे आवश्यकता भासेल, असे अग्निशमन दलाने या विषयी दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे.

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील भुयारी मार्गात कलादालनच व्हायला हवे. महिला बचत गटांसाठी मुंबईत अनेक जागा आहेत. तेथे महिला बचत गटांना आपापल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा दिली जाईल आणि तेथे ग्राहकही मोठय़ा संख्येने येतील. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून स्टंटबाजी सुरू झाली आहे.

– तृष्णा विश्वासराव, सभागृह नेत्या, मुंबई महापालिका