टँकरमधून होणारी पिण्याच्या पाण्याची चोरी आणि शिवसेनेत दाखल झालेल्या माजी नगरसेवकाच्या भावाविरुद्ध पाणीचोरीप्रकरणी दाखल झालेला गुन्हा या मुद्दय़ांवरून भाजपने मंगळवारी पालिका सभागृहात शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणीचोरीला आळा बसविण्यात प्रशासन अपयशी ठरले असून त्यांचे प्रमुख या नात्याने आयुक्तांविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणण्याचा इशारा देत शिवसेनेने भाजपलाच गोत्यात आणले. या विषयावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा रंगला होता.
मुंबईमध्ये टँकरमधून पिण्याच्या पाण्याची चोरी करण्यात येत असून या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. कोटक यांनी वारंवार मागणी केल्यामुळे अखेर महापौर स्नेहल आंबेकर यांनी त्यांना परवानगी दिली.