भाजप-शिवसेना युतीतील विधानसभेच्या जागावाटपासाठी अखेर शुक्रवारचा मुहूर्त मिळाला, पण उद्याच्या चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ही प्राथमिक चर्चा होणार असून युतीतील जागावाटपाच्या ठरलेल्या सूत्राव्यतिरिक्ति एकमेकांना कोणत्या जागांची अपेक्षा आहे, याची बोलणी त्यात होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे हे भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलणार नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राजनाथसिंह अशा वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
भाजप व शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे हाकारे दिल्यानंतर आणि सर्व जागा लढण्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यानंतर युतीतील जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात करण्याचा प्रस्ताव उभयपक्षी देण्यात आला. त्यामुळे युतीतील कोंडी फुटली असून जागावाटपाच्या बोलणीला आता सुरूवात होणार आहे. त्यात भाजपकडून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र भुसारी, पंकजा मुंडे हे सहभागी होतील, तर शिवसेनेकडून संजय राऊत, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, लीलाधर डाके, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई हे नेते शिवसेनेकडून चर्चेत सहभागी होणार आहेत.
लोकसभेतील घवघवीत यशानंतर भाजपला किमान ५० टक्के म्हणजे १४४ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेकडे १७१ व भाजपकडे ११७ जागा आहेत. गेल्यावेळी शिवसेनेने भाजपला दोन जागा अधिक दिल्या होत्या. पण गोपीनाथ मुंडे यांच्या शिष्टाईमुळे दिलेल्या त्या दोन जागा कायमस्वरूपी नसून तो गेल्या निवडणुकीसाठीचा अपवाद होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. प्राथमिक फेरीत केवळ एकमेकांच्या अपेक्षा समजून घेण्याव्यतिरिक्त फारशी काही प्रगती होणे अपेक्षित नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप आणि शिवसेना ज्या जागा कधीही जिंकू शकलेली नाही, अशा जागांचे आदानप्रदान करण्याबाबत प्राथमिक फेरीत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच दोन्ही पक्षांमधील नेते, या पक्षात नव्याने दाखल झालेले व येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी एकमेकांकडून दोन्ही पक्षांना जागा हव्या आहेत. युतीतील जागांची निश्चिती झाल्यावर रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमान पक्ष आणि शिवसंग्राम संघटना यांच्यासाठी कोणी व किती जागा सोडायच्या यावर निर्णय होईल. युतीतील जागावाटप झाल्यावर महायुतीची बैठक होणार आहे.