भाजपला फारशा जागा वाढवून न देण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून चारही घटकपक्षांना दोन्ही पक्षांकडून १६ जागा सोडण्यासाठी शिवसेना तयार आहे. भाजपने ११० तर शिवसेनेने १६१ जागा लढवाव्यात, असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. त्यास भाजपची तयारी नसल्याने शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम असून तणाव वाढत आहे. तर अपेक्षेइतक्या जागा मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
भाजपला किमान निम्म्या म्हणजे १४४ जागांची अपेक्षा असताना त्या देण्याची शिवसेनेची तयारी नाही. या जागा मिळाल्या नाहीत, तर युती तोडण्याचा निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या नेत्यांना दिली आहे. घटकपक्षांपैकी रिपब्लिकन पक्ष व स्वाभिमानी पक्षाला प्रत्येकी ६ आणि शिवसंग्राम पक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी दोन जागा देण्याची शिवसेनेची तयारी आहे. या एकूण १६ जागा भाजप-शिवसेनेने सोडाव्यात. दोघांनी समान जागा सोडाव्यात, असे शिवसेनेचे सूत्र असले तरी भाजपने ११० आणि शिवसेनेने १६१ जागा लढवाव्यात, या प्रस्तावावर शिवसेना ठाम आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. पण घटकपक्षांना १६ ते २० जागांपेक्षा अधिक जागा देण्याची शिवसेनेची तयारी नाही. एकटय़ा स्वाभिमानी पक्षालाच किमान १५ ते २० जागा हव्या आहेत. त्यामुळे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे नाराज असून ते महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहेत.
भाजपलाही ११० जागांवर समाधान मानता येणार नाही. भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी असून पक्षाची ताकद वाढल्याने इच्छुकही वाढले आहेत. या परिस्थितीत भाजपच्या जागा वाढल्या नाहीत, तर त्याचा कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश जाणार असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरेल, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अधिक जागा मिळविण्यासाठी भाजपच्या वाटाघाटी सुरु आहेत.