समसमान जागावाटपासाठीचा आग्रह सोडून भाजपने गुरुवारी शिवसेनेसमोर १३० जागांचा प्रस्ताव ठेवत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारची मुदत दिली. पण शिवसेनेने भाजपची मुदत धुडकावून लावली. जागावाटप जुन्याच सूत्रानुसार होईल, असे सांगत सेनेने भाजपला ११९ जागा देऊ केल्या आहेत. त्यातही ‘मित्रपक्षांना सामावून घ्या’ असेही सांगितल्याने भाजपच्या वाटय़ाला ११० जागाच येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी असून आज, शुक्रवारी होणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या २८८ जागांपैकी १८ जागा मित्रपक्षांना सोडून उरलेल्या जागा समसमान वाटून घ्याव्यात, हा भाजपचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला होता. त्यामुळे भाजपने १३५ ऐवजी १३० जागांची मागणी सेनेकडे केली. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांनी तसा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला व निर्णय घेण्यासाठी शुक्रवारची मुदत दिली. त्यावर निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक ‘मातोश्री’ येथे पार पडली. या बैठकीत सर्वच नेत्यांनी जागावाटपाचे जुनेच सूत्र कायम ठेवण्याचा आग्रह धरला. ‘शिवसेना झुकली’, असा समज निर्माण होऊ देऊ नये.  शिवसेनेचा आत्मसन्मान व महाराष्ट्राचा अभिमान राखला जाईल, शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईचा योग्य आदर होईल, असा निर्णय घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपला अधिक जागा देऊ नये, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
युतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपने दिलेली मुदत शिवसेनेने धुडकावून लावली आणि निर्णयाचा चेंडू भाजपच्या कोर्टात ढकलला. सेनेने भाजपला जुन्या सूत्रानुसार, ११९ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातही नऊ जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्यात, असे कळवले आहे. या सूत्रानुसार, भाजपच्या वाटय़ाला गतवेळेपेक्षाही कमी, ११० जागाच येणार आहेत. हा प्रस्ताव भाजपला मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आज होणाऱ्या पक्षाच्या कोअर समितीत काय निर्णय होतो, त्यावर युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
भाजपची खेळी
गेली २५ वर्षे असलेली युती शिवसेना कायम हरत असलेल्या काही जागांसाठी भाजपने तोडली, केंद्रात सत्ता आल्यावर जुन्या मित्रपक्षांची साथ भाजप सोडत आहे, हा समज जनतेमध्ये पसरू नये, यासाठी भाजप राजकीय व्यूहरचना करीत आहे. शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव नाकारल्यास  जे १३० किंवा १३५ मतदारसंघ हवे आहेत, त्यांची यादी भाजप जाहीर करेल. त्याचबरोबर भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक २० व २१ सप्टेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. त्यात उमेदवार यादीला मान्यता मिळाल्यावर टप्प्याटप्प्याने याद्याही जाहीर केल्या जातील. शिवसेनेने युती तोडण्याचा पवित्रा घेतल्यास भाजप सर्व जागा लढवेल किंवा न तोडल्यास काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होतील.