राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमधील वाद दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राच्या प्रती जाळण्याची भाषा केल्यानंतर ‘सामना’मधून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण असल्याचे शरसंधान ‘सामना’तून भाजपवर साधण्यात आले आहे.

सत्य सांगणाऱयांची मुस्कटदाबी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढत असून, ‘सामना’ जाळण्याचा विचार म्हणजे हिंदुत्व जाळण्याचा विचार असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. भाजपला सत्ता डोक्यात गेल्याचाही घणाघात सेनेने केला आहे. याशिवाय, मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रउभारणीचा जो विडा उचलला आहे त्या विड्यात शेंदूर कालवण्याचा हा प्रकार त्यांचेच लोक करीत असतील तर या अस्तनीतल्या दलालांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईत पंतप्रधानांच्या मन की बात हा कार्यक्रम जनतेसोबत ऐकण्यासाठी ‘मन की बात, चाय के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन भाजपकडून करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. ज्यांनी ‘मनोगत’ पाक्षिकाच्या प्रती जाळल्या त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राच्या जाळपोळीसही तयार राहावे, असा इशारा आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला होता. शेलार यांच्या याच वक्तव्यावर सेनेने आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे.