‘सामना’ मधील अग्रलेखावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारल्यानंतर ‘मी योग्य वेळी बोलेन,’ असा सूचक इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याने आणि दुष्काळग्रस्तांना केंद्र सरकारने अजून मदत न दिल्याने व राज्य सरकारची मदत अपुरी असल्याने शिवसेना आता आक्रमक भूमिकेत असून भाजपची कोंडी करण्यासाठी पावले टाकली जात आहेत.
मुख्यमंत्री व अर्थमंत्री विदर्भातील असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. सरकार बदलले आहे, असे वाटत नाही. आता निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी कोणाची असे सवाल शिवसेनेने उपस्थित केले आहेत. सत्तेत सामील असतानाही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची पंचाईत झाली आहे. अग्रलेखाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ‘कोणी काही लिहीले, म्हणजे अणुबाँब फुटलेला नाही. सारे काही आलबेल आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. या भूमिकेबद्दल ठाकरे यांना विचारता ‘कोणाला जे काही बोलायचे असेल, ते बोलू दे, मी योग्य वेळी उत्तर देईन, ’ असे वक्तव्य ठाकरे यांनी केले आहे.
शिवसेना नेते विदर्भ दौऱ्यावर असून शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. भाजपची विदर्भात ताकद असून आता शिवसेनेला तेथे पाय रोवायचे असल्याने शेतकरी आत्महत्यांच्या मुद्दय़ावरुन भाजपला घेरण्यासाठी पावले टाकली जात आहेत.