भाजपच्या हट्टीपणामुळेच गेली सात वर्षे वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) संसदेत अडकून पडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते शनिवारी मुंबईतीत एका कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेस सत्तेत असताना अरूण जेटली आणि नरेंद्र मोदी सातत्याने विरोध केल्यामुळेच हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नव्हते. सध्या भाजपकडून काँग्रेसवर संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा आरोप होत असला तरी काँग्रेस सत्तेत असताना भाजपने हेच केले, असे राहुल यांनी सांगितले. जीसएसटी विधेयकायाची मुळची संकल्पना काँग्रेसची असून काँग्रेसनेच ते पहिल्यांदा संसदेत मांडले होते. मला आठवते की, काँग्रेस पक्ष सत्तेत असताना मोदी भारतीय अर्थव्यवस्था आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवायचे. संसदेचे कामकाज बंद पाडणे हे काँग्रेसची संस्कृती नाही. अरूण जेटली यांनी एकदा इंग्लंडमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान, संसदेचे कामकाज रोखून धरणे हीच आमची रणनीती असल्याचे म्हटले होते. भाजपने गेल्या दहा वर्षांत सातत्याने हेच केले आहे. संसदेचे कामकाज कोणत्याही पद्धतीने बंद पाडणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते, अशी टीका राहुल यांनी केली. या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या पायाभूत सुविधांची गरज आहे. मात्र, त्यादृष्टीने अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लवकरात लवकर लागू करण्यासाठी सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असला तरी तीन अटी मान्य झाल्याशिवाय माघार नाही, अशी काँग्रेसची ठाम भूमिका असल्याचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले होते.

याशिवाय, भाजप लोकांची विभागणी करत असल्याचा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य फरक आहे तो म्हणजे भाजप लोकांची विभागणी करते. त्यांच्यासाठी लोक हिंदू असतात, शीख असतात. मात्र, आमच्यासाठी ते फक्त भारतीय आहेत, बाकी काहीही नाही, असेही राहुल यांनी यावेळी म्हटले.