गेल्या दोन महिन्यांत चंद्रपूर, लातूर, पनवेल या महानगरपालिका जिंकल्यावर भाजपने आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सत्ता कायम राखण्याचा निर्धार केला आहे. जैन, मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या या शहरातील राजकीय वातावरण भाजपला अनुकूल आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील मीरा-भाईंदर हे शहर गेल्या २० ते २५ वर्षांमध्ये विकसित झाले. १९८०च्या दशकात मुंबईत जागेचे दर गगनाला भिडले आणि भाईंदर, वसई-विरार, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आदी शहरांमध्ये जागेला भाव आला. शहरांमध्ये नियोजनाचा घोळ असल्याने बिल्डरमंडळींनी त्याचा फायदा उठविला. मुंबईत जागेचे भाव वाढल्याने आसपासच्या शहरांमध्ये तुलनेत स्वस्तात घरे मिळत गेल्याने नागरिकांनी घरे खरेदी केली. जुने ग्रामपंचायतींचे दाखले, आराखडे मंजूरीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बिल्डरांनी इमारती उभारल्या. नगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही आणि बिल्डरांचे फावले. जागा मिळेल तेथे इमारती उभारण्यात आल्या. त्यातून भाईंदर शहराचा पार बट्टय़ाबोळ झाला. अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. मुंबईच्या वेशीवर असलेल्या या शहरात कसलाही नियोजनाचा पायपोस नसल्याने भाईंदर शहर गचाळ शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकसंख्या वाढत गेली, पण त्या तुलनेत पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर भाईंदरकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पाण्यावरून मागे भाईंदर शहरात दंगल आणि गोळीबार झाला होता.

राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे हितसंबंध

मीरा-भाईंदर नगरपालिका असताना साराच गोंधळ होता. नगरपालिकेतील नगरसेवक, अधिकारी आणि शासकीय यंत्रणा यांच्या अभद्र युतीतून भाईंदर शहराचा पाच विचका झाला. गिल्बर्ट मेंन्डोसा यांच्यासारखा गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला नगराध्यक्ष तर अनेक नगरसेवक संघटित गुन्हेगारीशी संबंधित होते. या साऱ्यांनी शहराची पार वाट लावली. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यावर काहीसा फरक पडला असला तरी शहराला आकार-ऊकार काहीच नाही.

अमराठी भाषकांचे प्रमाण वाढले

मीरा-भाईंदरमध्ये संमिश्र स्वरूपाची वस्ती आहे. जैन समाजाची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, अल्पसंख्याक यांचे प्रमाणही लक्षणिय आहे. आगरी, कोळी समाजही बऱ्यापैकी आहे. उत्तन भागात ख्रिश्चन समाजाची वस्ती आहे. बहुढंगी अशा या शहराची सत्ता सध्या भाजपकडे आहे. २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक तर भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले होते. महानगरपालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशीच आझाद मैदानात निघालेल्या अल्पसंख्याक समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. त्यातून महिला पोलिसांवर हात उगारला गेला होता. त्याची प्रतिक्रिया उमटली होती. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने रातोरात हा मुद्दा तापविला आणि त्याचा राजकीय लाभ झाला होता.

जैन समाजाचे प्राबल्य असलेल्या या शहरात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपचे नरेंद्र मेहता हे निवडून आले. तर महापौरपद भाजपच्यी गीता जैन यांच्याकडे आहे. जैन, गुजराती आणि मारवाडी समाजात भाजपने घट्ट बांधणी केली आहे. याशिवाय उत्तर भारतीयांची मतेही भाजपला मिळतात. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गुजराती, मारवाडी, जैन आणि  उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते भाजपला मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले होते. हाच कल मीरा-भाईंदरमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कायम राहिल, अशीच चिन्हे आहेत.

भाजप, शिवसेना, काँग्रेस लढत

पुन्हा सत्ता मिळविण्याकरिता भाजपने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीची ताकद फार कमकुवत झाली आहे. राष्ट्रवादीचे अनेक बिनीचे शिलेदार पक्ष सोडून गेले. भूखंड हडप केल्याप्रकरणी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगाची हवा खाऊन आलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंन्डोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यातून राष्ट्रवादीचे अस्तित्वच क्षिण झाले आहे. भाजपला आव्हान देण्याकरिता शिवसेना रिंगणात उतरणार आहे. उत्तर भारतीय, जैन, गुजराती, मारवाडी मतदार तेवढी साथ देत नाहीत. यामुळे केवळ मराठी मतांवरच शिवसेनेची सारी मदार आहे. मतदारांचे प्रमाण लक्षात घेता फक्त मराठी मतदारांच्या पाठिंब्यावर शिवसेनेला सत्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसची सारी मदार ही मीरा रोड भागातील मुस्लीम मतदारांवर आहे. माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यामुळे अल्पसंख्याकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळतो. भाजप आणि शिवसेनेच्या वादात काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा मुझफ्फर हुसेन यांना विश्वास आहे.

भाजपच्या आशा पल्लवित

चंद्रपूर, लातूर, पनवेल महानगरपालिकांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले. शहरी भागांचा कौल हा भाजपला अनुकूल असा आहे. त्यातच मीरा-भाईंदरमध्ये अमराठी मतदारांचे मतदान हे निर्णायक असल्याने भाजपच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. ९५ पैकी जास्तीतजास्त जागाजिंकू, असा विश्वास भाजपचे विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शाकाहारी-मांसाहारी वाद 

जैन, गुजराती समाजाचे प्राबल्य असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये दोन वर्षांपूर्वी जैन समाजाच्या पर्युषण काळात चार दिवस मासंहारबंदीवरून बराच वाद झाला होता. त्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीने चार दिवस मांसविक्री बंद ठेवण्याच्या भाजपची सत्ता असलेल्या महानगरपालिकेच्या निर्णयावरून बरीच टीकाही केली होती. या वादानंतर मराठी विरुद्ध जैन, गुजराती, मारवाडी असा वाद झाला होता. या वादानंतर गेल्या वर्षी मात्र महानगरपालिकेने वाद टाळला होता.

एकूण प्रभाग ९५

महिलांसाठी राखीव ४८

एकूण मतदार – ५ लाख ९३ हजार

मतदान – २० ऑगस्ट

मतमोजणी – २१ ऑगस्ट