भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी काही नावांची चर्चा असली तरी तूर्तास प्रदेशाध्यक्षांची निवड पुढे ढकलण्यात आली असून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर ही निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचा मंत्रिमंडळात समावेश आणि मंत्रिमंडळ विस्तार यातून आधी मार्ग काढल्यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी पावले टाकली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदी असल्याने आता पक्षकार्यासाठी वेळ देणे, फडणवीस यांना शक्य नसल्याने, आणि भाजपच्या ‘एक व्यक्ती एक पद’ सूत्रानुसार आता नवा प्रदेशाध्यक्ष नेमणे आवश्यक असल्याने प्रदेशाध्यक्षांची निवड लवकर करण्याचे प्रयत्न होते. पण अजून मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागलेला नाही. त्यातच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन असल्याने तूर्तास प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी घाई करण्यापेक्षा ती सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने प्रदेशाध्यक्षपदी बहुजन समाजातील नेत्याची निवड करण्यात यावी, असा मतप्रवाह पक्षामध्ये आहे.