पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती

चर्नी रोड रेल्वे स्थानकालगतच्या महर्षी कर्वे मार्गावरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. पालिका प्रशासनाने सादर केलेल्या पूल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असताना शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने या पुलाची नागरिकांच्या श्रमदानातून डागडुजी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

चर्नी रोड रेल्वे स्थानकालगतच्या महर्षी कर्वे मार्गावरील पादचारी पुलावरून रेल्वे प्रवाशी मोठय़ा संख्येने ये-जा करीत असतात. तसेच गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठीही या पुलाचा वापर केला जातो. या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून तो धोकादायक बनू लागला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी पाच वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाकडे केली होती. सतत पाठपुरावा केल्यानंतर पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूल उभारणीचे ६.३३ कोटी रुपयांचे कंत्राट न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रशासनाच्या या प्रस्तावाला स्थापत्य समिती आणि स्थायी समितीनेही मंजुरी दिली असून कंत्राटदाराला कार्यादेशही मिळाले आहेत. लवकरच या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

गेले अनेक महिने या पादचारी पुलाची अवस्था दयनीय बनली असून भाजपचे स्थानिक आमदार मंगलप्रसाद लोढा यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार पश्चिम रेल्वेकडे पाठपुरावा केला, परंतु पश्चिम रेल्वेने पुलाची दुरुस्ती केलेली नाही. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या श्रमदानातून या पुलाची डागडुजी केली जाईल, अशा इशारा देणारे बॅनर्स भाजपने या परिसरात झळकविले आहेत. त्यामुळे भाजप आणि सेनेमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.