कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत असून भाजपची किमान निम्म्या जागांची मागणी आहे. शिवसेनेने निम्म्या जागा दिल्या तरच युती करण्यात रस असल्याची भाजपची भूमिका आहे. वाटाघाटी फिसकटल्या, तर स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारीही भाजपच्या नेतृत्वाने सुरू केली आहे.

ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी काम करण्याच्या सूचना पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही शिवसेनेशी २५ वर्षे असलेली युती तोडण्यात आली होती. बहुमत न मिळाल्याने नाईलाज म्हणून शिवसेनेचा पाठिंबा घेतला असला तरी भाजपची ताकद वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाजपची मानसिकता आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक प्रभागांमध्ये भाजपला चांगली मते मिळाली आहेत. ते प्रभाग भाजपला मिळालेच पाहिजेत, अशी आमची भूमिका असल्याचे भाजपमधील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. जागावाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या स्थानिक पातळीवर सुरू असून शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चेची प्राथमिक फेरीही झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होऊ नये आणि राज्यात सरकारमध्ये एकत्रित असताना निवडणुकीत एकमेकांवर टीकास्त्र सोडू नये, यासाठी युती केली पाहिजे, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांचे मत आहे. पण शिवसेनेने निम्म्या जागा सोडल्या नाहीत, तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.