शिवसेनेशी अटीतटीच्या लढाईत दोन जागा कमी पडल्याची खंत मुंबईत भाजपची ताकद दाखविण्यासाठी भाजप अधिक आक्रमक होणार असून २०१९ च्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरु करण्याच्या सूचना मुंबई भाजपच्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शिवसेनेशी महापालिका निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत दोन जागा कमी पडल्याबद्दल अनेक भाजप नेत्यांनी खंत व्यक्त केली. महापालिकेचा कारभार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त करण्याची मागणी भाजपने केली असून ‘पहारेकरी’ म्हणून काम पाहणार असल्याने शिवसेनेशी आणखी जोरदार खडाजंगी पालिकेत सुरु होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सह सरचिटणीस व्ही सतीश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका आणि २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली. मुंबईतील सर्व सात हजार बूथपैकी भाजपने दोन हजार ३६८ बूथमध्ये बहुमत मिळविले असून शिवसेनेने २४३८ बूथमध्ये अधिक मते मिळविली आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेसह विरोधी पक्षांचे वर्चस्व असलेल्या सर्व बूथवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. महापालिकेत स्वबळावर अटीतटीने लढल्यानंतर केवळ दोन जागांमुळे सत्ता मिळू न शकल्याचे शल्य आशिष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांनीही व्यक्त केले. भाजपने अधिक आक्रमकपणे आता मुंबईत ताकद वाढविण्याचे ठरविले असून एक मेला महाराष्ट्रदिनी गेल्यावर्षी प्रमाणेच मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रम साजरे केले जातील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना व कामगिरी जनतेपर्यंत पोचवून पक्षाची ताकद वाढविण्यात येईल. महापालिकेत पहारेकरी महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शीपणे करण्यासाठी सभागृहनेते मनोज कोटक यांनी सविस्तर ठराव मांडून महापालिकेला व पर्यायाने शिवसेनेलाच खणखणीत इशारा दिला आहे. भाजप पहारेकरी म्हणून काम पाहणार असल्याने शिवसेनेशी चांगलाच ‘सामना’ रंगणार आहे. विकास आराखडा मंजूर झाल्यावर लगेच अंमलबजावणी करा, चांगले रस्ते मिळावेत,पर्यावरणासाठी आवश्यक मोकळ्या जागा, झाडांची विशेष काळजी घ्यावी, बेस्टला १०० कोटी रुपयांची दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करावी, नद्या, नाल्यांमध्ये मलनिसारण थांबवून या वाहिन्यांचे जाळे उभारावे, सार्वजनिक शौचालये उभारणी व त्यांची देखभाल यावर लक्ष द्यावे, यासह अनेक मागण्या भाजपने ठरावाद्वारे केल्या आहेत.