शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा

मुंबईपाठोपाठ मीरा-भाईंदरमध्येही गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाची एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचा मिळालेला पाठिंबा यामुळे भाजपला यश मिळाले असले तरी हा कल शिवसेना आणि काँग्रेससाठी भविष्यातील निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा मानला जातो. बिगर मराठी मतदार भाजपकडे वळल्याने काँग्रेसचा मतांचा टक्का घसरला तर अमराठी मतदारांनी फिरविलेली पाठ तसेच मध्यमवर्गीय मराठी मतदारांना असलेले मोदींचे आकर्षण त्यातून शिवसेनेच्या यशावर परिणाम होऊ लागला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य आहे. या मतदारांचे प्रमाण ६० टक्क्य़ांच्या आसपास आहे. ही सारी एकगठ्ठा मते तसेच मराठी मतदारांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले. मराठी वस्ती असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. भिवंडी, परभणी, मालेगाव महानगरपालिकांमध्ये मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मीरा-भाईंदरमध्येही अल्पसंख्यांकबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमदेवार निवडून आले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिगर मराठी मतदारांनी भाजपला मोठय़ा प्रमाणावर मतदान केल्याचे स्पष्ट झाले होते. शिवसेना व नंतर मनसेच्या विरोधात उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला मतदान करीत. पण भाजपचा पर्याय समोर आल्याने उत्तर भारतीयांचे मते ही मुंबईत भाजपला मिळतात हे २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून बघायला मिळाले. महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची वस्ती असलेल्या प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागाजिंकल्या. मुंबईतील बिगर मराठी मतदारांना भाजप जास्त जवळचा वाटू लागला आहे. ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही मराठी तसेच अमराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपला अनपेक्षित जागा जिंकता आल्या. मराठी मतदारांमध्ये साधारणत: मध्यवर्गीय मतदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे.

मीरा-भाईंदरमध्ये जैन मतदारांची संख्या लक्षणिय आहे. दोनच वर्षांपूर्वी पर्युषण काळात मासंविक्री बंदीवरून वाद झाला होता. या पाश्र्वभूमीवर जैन धर्मगुरूंचे भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारी चित्रफीत भाजपसाठी उपयोगी ठरली.

इतर पक्षांपुढे मोठे आव्हान

मुंबई व आसपासच्या महानगरांमध्ये बिगर मराठी मतदारांचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा हा शिवसेनेसाठी विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भाजपबरोबर युती असताना मराठी तसेच गुजराती, काही प्रमाणात उत्तर भारतीयांची मते मिळाल्याने विजयाचे गणित जुळणे सोपे जात असे. पण युती तुटल्यावर शिवसेनेचा जनाधार कमी होत गेला. त्यातच मराठी मतांमध्ये विभाजन करण्यासाठी मनसे आहेच. सध्या मनसेचे इंजिन बाजूला पडले असले तरी भविष्यात राज ठाकरे यांनी उचल खालल्यास पुन्हा शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन होऊ शकते. मुंबईत राष्ट्रवादीला बाळसे धरता आलेच नाही. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यांमध्ये बिगर मराठी मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. बाह्य़ पुण्यातील मध्यमवर्गीय, सुशिक्षित मतदारांनी राष्ट्रवादीला मतदान करण्याचे टाळल्याने सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी झाले होते. भाजपला सध्या काँग्रेस हा पर्याय आहे. पुढेमागे राजकीय वातावरण बदलल्यास काँग्रेसला त्याचा लाभ होऊ शकतो. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी कठीण आव्हान असेल.