पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी त्याचे सारे श्रेय हे भाजपपेक्षा रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर या पिता-पुत्राला जाते. ठाकूर कुटुंबीय ज्या पक्षात असते त्या पक्षाचा विजय निश्चित असतो, असा इतिहास आहे. या निकालाने तीच परंपरा कायम ठेवली आहे.

रामशेठ ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून स्वत:ची ताकद निर्माण केली. १९९८ आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीत ते शेकापच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले होते. वाजपेयी सरकारचा लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी एका मताने पराभव झाला होता. तेव्हा रामशेठ ठाकूर यांना कमालीचे महत्त्व आले होते, पण त्यांनी भाजपला साथ देण्याचे टाळले होते. पुढे केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर ठाकूर यांनी काँग्रेसची वाट पकडली. पनवेल नगरपालिकेत ठाकूर यांना मानणाऱ्यांची सत्ता आली. २००९च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर हे काँग्रेसच्या वतीने विधानसभेवर निवडून आले. २०११ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली होती. काँग्रेस पक्षात असताना रामशेठ ठाकूर यांना पक्षात चांगला मानसन्मान देण्यात आला. प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती.

२०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाला आणि भाजपची सत्ता आली. कायम सत्तेच्या सोबत राहायचे हे ठाकूर यांचे बहुधा गणित ठरलेले आहे. केंद्रात भाजपची सत्ता येताच ठाकूर यांना भाजपचे आकर्षण निर्माण झाले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधील कोटय़वधी रुपयांची कामे आणि नवी मुंबई विमानतळासाठी भरणीचे मोठे काम यामुळेच ठाकूर यांना भाजपची दारे खुणावू लागली. २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आलेले प्रशांत ठाकूर हे राहुल ब्रिगेडमधील आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले. पण पुन्हा काँग्रेसची सत्ता येणे कठीण आहे याचा अंदाज आल्यावर प्रशांत ठाकूर यांनी भाजपची वाट पकडली. त्यासाठी शीव-पनवेल मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या टोलचे कारण त्यांनी दिले. ‘हिरो’ होण्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी टोलची ढाल पुढे केली होती.

प्रशांत ठाकूर यांची समजूत काढण्याचे प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले होते. पण ठाकूर यांनी आघाडी सरकार टोल सुरू करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपची वाट पत्करली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्ह्य़ांमध्ये केवळ प्रशांत ठाकूर हे एकमेव भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. भाजपने मग ठाकूर यांचा वापर करून घेण्यास सुरुवात केली. भाजप आणि संबंधित संस्थांच्या पनवेलच्या आसपासच्या शिबिरांच्या आयोजनाची जबाबदारी प्रशांत ठाकूर यांच्यावर सोपविण्यात येते, अशी माहिती भाजपच्या गोटातून देण्यात आली. ‘सिडको’चे ठेकेदार म्हणून पुढे आलेल्या ठाकूर कुटुंबीयांनी दाम, दंड, भेद या साऱ्यांचा महानगरपालिका निवडणुकीत चांगलाच वापर केला. मतांसाठी मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याचा आरोप शेकापने केला आहे.

शेकाप आघाडीला धक्का

पनवेलमध्ये पूर्वी शेकापचे वर्चस्व होते. दि. बा. पाटील, दत्तूशेठ पाटील मग विवेक पाटील हे निवडून येत. प्रशांत ठाकूर यांनी आधी काँग्रेस आणि आता भाजपच्या माध्यमातून शेकापचे वर्चस्व मोडीत काढले आहे. शिवसेनेची पार वाताहत झाली. शेकापबरोबर आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. प्रशांत ठाकूर यांची ताकद आणि भाजपला मानणारा शहरातील वर्ग या समीकरणातून पनवेलमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळाले आहे.