हैदराबाद येथील दिलसुखनगरजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागील सूत्रधारांबाबत अद्याप तपास यंत्रणा अंधारात असल्या तरी या स्फोटामागे ‘नागपूर कनेक्शन’ आहे का, याचा तपास आता राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने सुरू केला आहे. नागपुरातून काही दिवसांपूर्वी तब्बल ८० डिटोनेटर्स जप्त करण्यात आले होते. अशाच डिटोनेटर्सच्या साहाय्याने स्फोट घडविण्यात आले का, याचाही शोध घेतला जात आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकही सक्रिय झाले आहे.
दिलसुखनगरातील कोणार्क थिएटर वा कोतापेठ बाजारपेठेत स्फोट घडविण्याचा डाव होता, परंतु वेळ चुकल्याने बस स्थानकाजवळ स्फोट घडविण्यात आला असावा, असा संशय दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.
अद्याप दोन पथके हैदराबाद पोलिसांच्या मदतीसाठी ठाण मांडून आहेत.
 नागपूर कनेक्शनचा शोध घेण्यासाठी आणखी एक पथक तैनात करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. २१ फेब्रुवारीला स्फोट झाल्यानंतर फेसबुकवर ‘बॉम्बस्फोट देशमुख – हैदराबाद मिशन कम्प्लीट इंडियन मुजाहिद्दीन’ असे पेजही तयार करण्यात आले होते.
हे पेज कोणी टाकले याचाही गुप्तचर यंत्रणेकडून तपास सुरू आहे. या स्फोटामागे लष्कर ए तोयबा ही संघटना असावी, असेही तपास यंत्रणांकडून सुरुवातीला सांगितले जात होते, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात, या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीन असून यासिन भटकळनेच प्रत्यक्षात बॉम्ब ठेवल्याचे म्हटले आहे.
अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर १३ व्या दिवशी स्फोट घडविण्यामागील दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा विचार करून पुन्हा ४० व्या दिवशी घातपात होऊ शकतो, या शक्यतेनुसार गुप्तचर यंत्रणेने सर्वत्र दक्षतेचा इशारा दिला आहे.
यासिन भटकळ बॉम्ब ठेवतो अन् पळतो..
मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोटासाठी इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख म्होरक्या यासिन भटकळ यानेच भायखळा येथील एका खोलीत बॉम्ब बनविले, हे स्पष्ट झाले होते. यापैकी एक बॉम्ब यासिननेच ठेवला असण्याची दाट शक्यता तपास यंत्रणांना वाटत आहे. त्यानंतर राज्याचा दहशतवादविरोधी विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या वादात यासिन मुंबईतून सटकला, परंतु त्याच वेळी त्याने पुण्यात बॉम्ब ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते. मुंबई तसेच पुण्याचे फुटेज आणि आता हैदराबाद फुटेजमध्येही बॉम्ब ठेवणारी व्यक्ती सारखी असल्याचे दिसत आहे. तो यासिन भटकळ असावा, असा अंदाज आहे. फरार असलेला यासिन तपास यंत्रणांच्या नाकावर टिच्चून घातपाती कारवाया करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिशन देशमुख
‘मिशन देशमुख’ हा कोड हैदराबाद स्फोटासाठी दहशतवाद्यांनी वापरला होता. त्यातील आद्याक्षरांचा अर्थ असा : डी – दिलसुखनगर; ई- ईस्ट; एस – साऊथ; एच – हैदराबाद; एम – मुजाहिद्दीन; यू – हा इंग्रजी आद्याक्षरांत २१ व्या क्रमांकावर असल्यामुळे २१ ही तारीख; के – कोणार्क किंवा कोतापेठ; एच – दिलसुखनगर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे हायवेवर आहे हे दर्शविण्यासाठी.