नियोजन करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

जानेवारी ते जुलै दरम्यान राज्यातील सरकारी व पालिकेच्या रक्तपेढय़ांतील सुमारे ३ हजार रक्तपिशव्या केवळ मुदत उलटून गेल्याने वाया गेल्या असून दुसरीकडे येत्या दिवाळीत महाविद्यालये, कंपन्यांना सुट्टी असल्यामुळे निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवडय़ाबाबत रक्तपेढय़ा चिंतेत आहेत. यावर राज्य रक्त संक्रमण परिषदेने ऑक्टोबर महिन्यात उद्भवणारा तुटवडा रोखण्यासाठी रक्तपेढय़ांना नियोजनाचे आवाहन केले आहे.

सर्वसाधारणपणे महाविद्यालये व खासगी कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र दिवाळीमध्ये महाविद्यालयांना सुट्टी असल्याने या दिवसात रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. अनेक खासगी व छोटेखानी रक्तपेढय़ांमध्ये तर रक्ताचा साठा निम्माने कमी होतो. साधारणत: मुंबईतील प्रमुख जे. जे. महानगर रक्तपेढीत दोन हजारांहून जास्त रक्तपिशव्या उपलब्ध असतात. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३०० रक्तपिशव्याच उपलब्ध होत्या. ऑक्टोबर महिन्यातील रक्ताची टंचाई रोखण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढय़ांना ऑक्टोबर महिन्यासाठी रक्ताची तरतूद करण्याचे आवाहन केले आहे. महाविद्यालयांची सुट्टी सुरू होण्यापूर्वी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे किंवा धार्मिक संस्था व खासगी कंपन्यांमध्ये रक्तदान शिबीर भरविण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच रेल्वे स्थानके, बस स्थानके येथेही रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्याने ऑक्टोबर महिन्यात निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवडय़ावर नियंत्रण आणता येईल, असेही रक्तपेढय़ांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मे व ऑक्टोबर महिन्यात उद्भवणाऱ्या रक्त टंचाईचा सर्वाधिक फटका हा थेलेसेमियाग्रस्त रुग्णांना होतो. रक्तातील दोषामुळे निर्माण होणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीन झपाटय़ाने कमी होते. थेलेसेमियाचे चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईत आहे. या रुग्णांना महिन्याला किमान २५ हजार रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. त्यामुळे मे व ऑक्टोबर या रक्तटंचाईच्या काळात थेलेसेमियाग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने ऑक्टोबर व मे महिन्याच्या कालावधीतील रक्तटंचाई रोखण्यासाठी रक्तदान शिबिरांची आखणी करावी, अशी मागणी केली आहे.