पुढच्या वर्षी निवडणुका आणि त्यामुळे राजकीय साठमारीतून मागच्या वर्षीच्या नालेसफाई आणि रस्त्यांमधील उघड झालेले घोटाळे.. त्यातच गेल्या जूनमध्ये पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचा अनुभव आयुक्तांना आहेच. या सर्व पाश्र्वभूमीवर यंदाची मान्सूनची तयारी जय्यत असणार यात काही शंकाच नाही. आयुक्तांनी सगळ्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळेच मुंबईकर घामाच्या धारा पुसत असतानाच पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळ्या कारणानेही घाम फुटत आहे.

खरे तर उन्हाने नको जीव केलाय.. मराठवाडा, विदर्भात कडक उन्हाचा ताप, तर इकडे मुंबईत पार प्रेशर कूकरमध्येच ठेवल्यासारखी अवस्था.. मुंबईकर पाऊस कधी एकदा येतोय त्याची वाट पाहताहेत आणि तिकडे पालिकेचे अधिकारी पाऊस जरा उशिराने आला तर दोन-चार दिवस अधिक हातात मिळतील अशी आशा धरताहेत.. परिस्थितीच तशी आहे. रात्र थोडी सोंगे फार.. महानगरांचे महानगर आहे मुंबई. काही राज्यांपेक्षाही अधिक मोठा अर्थसंकल्प असलेल्या या शहरातील सर्वच काही अगडबंब. पालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला एक पेन्सिल द्यायची म्हटली तरी त्यासाठी किमान पाच लाख रुपये खर्च होतात, अशी स्थिती. हे अगदी लहान उदाहरण. शहरातील बाकीची कामे या पटीत वाढतात. त्यामुळे मान्सूनची पूर्वतयारी म्हणून नालेसफाई आणि रस्त्यांची डागडुजी हातात घेतली तरी काहीशे कोटी रुपयांचे काम आणि तेवढाच मोठा व्याप.
मुंबईचा पाऊसच आहे तसा. एकटय़ा जूनमध्ये इथे सरासरी ५२३ मिमी पाऊस पडतो. तोही बहुतेक वेळा दुसऱ्या पंधरवडय़ात केवळ १५ दिवसांत. एवढा पाऊस पडल्यावर पाण्याचा निचरा होणे, तोही समुद्राची भरती असताना.. हे काम जिकिरीचेच. त्यातच सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने पाणी जिरण्याची व्यवस्थाही शून्यानजीक. या स्थितीत नाले सज्ज ठेवणे महत्त्वाचे ठरते, पण तिथेच घोडे पेंड खाते. नाल्यातील गाळ काढणे एवढेच काम राहत नाही. नालेसफाईला सुरुवात झाली तेव्हा पहिली अडचण आली ती नाल्यांवरच्या झोपडय़ांच्या अतिक्रमणाची. नाल्याची पातळी वाढत असतानाही घर सोडून जाण्यास तयार नसलेले लोक नालेसफाईसाठी तेथून हटणे शक्यच नव्हते. मग वेगवेगळ्या क्लृप्त्या योजून हे काम सुरू झाले. नाल्यातून बाहेर पडलेल्या काहीशे मेट्रिक टन गाळासाठी आधीच भरलेल्या मुंबईच्या कचराभूमीवर जागा नव्हती. मग नवी मुंबई, ठाण्यातील जागा शोधण्याची गरज आणि येथे गाळ टाकण्यासाठी वेगळ्या कंत्राटाच्या निविदा.. पण हे साधेसरळ नसतेच, कारण त्याला राजकारणाची किनार असते. स्वत:च्या विभागातील नाल्याची सफाईपासून कंत्राटदारांची सल्लामसलत करण्यापर्यंत आणि प्रशासनाने गाळ वेळेत काढला नाही तर तोंडसुख घेण्यापर्यंत सर्वत्र राजकीय पक्षांचा पुढाकार दिसला. आता या सगळ्यातून नालेसफाईची डेडलाइन उद्यावर आली आहे. लहान नाल्यातील गाळ काढण्याची मुदत गेल्या बुधवारीच संपली, मोठय़ा नाल्यांसाठी ३१ मे ही शेवटची तारीख आहे. मुख्य म्हणजे नाल्यांमधील सफाईसाठी वॉर्ड अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे.
आज आणखी एका कामाची मुदत संपतेय, ती म्हणजे रस्तेदुरुस्तीची. मात्र नाल्यांएवढी ती कडक नाही. म्हणजे पालिकेने हातात घेतलेल्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली तर ३१ मेपर्यंत खोदकाम आटपायचे आहे. उद्यापासून कोणताही रस्ता खोदण्यास आयुक्तांनी मनाई केली आहे. उद्यापासून दुरुस्ती सुरू असलेले रस्ते किंवा खोदकाम झालेले रस्ते वाहतुकीसाठी तयार ठेवण्याची धडपड सुरू होईल. या वेळी निवडणुकांमुळे एक हजाराहून अधिक रस्ते दुरुस्तीसाठी कार्यादेश निघाले होते, पण त्यातील सुमारे अडीचशे रस्त्यांचेच काम पावसापूर्वी सुरू झाले. त्यामुळे पावसात रस्ते खोदलेले दिसणार नसले तरी पावसानंतर अर्धी मुंबई खोदलेली दिसेल. दुरुस्तीला आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता आहे. या रस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर असली तरी इतर सर्व रस्त्यांसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनाच कामाला लावले गेले आहे आणि ही यंत्रणा अपुरी असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. जूनपासून रस्त्यावरील खड्डय़ांसाठीही पालिका स्वत:चे मोबाइल अ‍ॅप आणत आहे. खड्डय़ांचा फोटो काढून अपलोड केला की पालिकेला जीपीएस यंत्रणेद्वारे त्या खड्डय़ाची जागाही समजणार आहे. मोबाइलवर ही यंत्रणा येत असल्याने या वेळी अधिकाधिक लोक त्यात भाग घेण्याची शक्यताही वाढलीय.
नालेसफाई आणि रस्ते हे मान्सूनपूर्व तयारीचे मुख्य घटक असले तरी त्याशिवायही पालिका अनेक पातळ्यांवर काम करत आहे. भरतीच्या वेळी शहरातील पाणी वरच्या बाजूने समुद्रात टाकण्यासाठी ब्रिटानिया येथे उदंचन केंद्र सुरू करण्यासाठी पालिका तयारीत आहे. गेल्या वेळी पहिल्याच पावसात मोठे दगड अडकून नाल्याचे तोंड बंद करणारी झापडच उघडी राहिल्याने समुद्राचे पाणी शहरात घुसले होते. त्यामुळे इतर सहा उदंचन केंद्रे ही पावसासाठी सज्ज ठेवली जात आहेत. झाडाच्या फांद्या किंवा संपूर्ण झाडच उन्मळून पडू नये यासाठी वृक्षछाटणीचेही काम सुरू आहे. ही वृक्षछाटणी शास्त्रीय पद्धतीने व्हावी अशी मुंबईकरांची इच्छा असली तरी अजूनही मोठय़ा फांद्याच्या हव्यासात झाडांना पार बोडके करून ठेवले जाताना दिसते. मलेरिया व डेंग्यू या साथीच्या आजारांसाठी कारणीभूत असलेल्या डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशक विभागही जानेवारीपासून काम करतो आहे. रुग्णालयात तब्बल दोन हजार अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. पावसासाठीच्या या तयारीसोबतच प्रत्येक उपनगरात पडत असलेल्या पावसाची माहिती देणारे मोबाइल अ‍ॅप अद्ययावत करण्यात येत आहे. पालिकेच्या सोबतीला या वेळी वेधशाळेची २५ केंद्रेही आहेत. वेळेत माहिती मिळाली तर मुंबईकरांना त्याचाही लाभ होईल. याचेही उद्घाटन या आठवडय़ात अपेक्षित आहे. पालिकेकडून अशा प्रकारे मान्सूनची तयारी तर जय्यत सुरू आहे. फेब्रुवारीतील निवडणुकांमध्ये मुंबईकरांना हा पावसाळा चांगल्या आठवणींसाठीच आठवावा, अशी पालिका प्रशासनाची व सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे. फक्त एकच पण आहे. यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल ९ टक्के जास्त पावसाची अपेक्षा आहे. हा पाऊस मुख्यत्वे जुल व ऑगस्टमध्ये आणि तोही नेहमीच्या पद्धतीने म्हणजे टप्प्याटप्प्यांमध्ये मुसळधार या स्वरूपात पडण्याचा अंदाज आहे. पाऊस आणि समुद्राची भरती यांचे गणित जुळले तर तिथे पालिकेला हात टेकवावे लागणार..
प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com