पालिका प्रशासनाचा निर्णय; दरवर्षी ४.६० कोटींचा खर्च अपेक्षित

सफाई कामगारांना वेळेवर साबण, टॉवेल मिळत नसल्याची, तसेच त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत कामगार संघटना आणि नगरसेवकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला कायमचा पूर्णविराम मिळावा यादृष्टीने प्रशासनाने तोडगा काढला आहे. नव्या वर्षांमध्ये सफाई कामगारांना साबण, टॉवेलऐवजी त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे कामगारांना आपल्या पसंतीचा साबण घेणे शक्य होणार आहे.

भल्या पहाटे घराबाहेर पडून मुंबईतील रस्ते झाडूनलोटून स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांना स्वच्छतेसाठी पालिकेकडून काबरेलिक साबण व हनिकोंब टॉवेल देण्यात येतो.

साबण, टॉवेल मिळण्यास विलंब होत असल्याने अखेर प्रशासनाने त्याचे पैसे सफाई कामगारांच्या बँकेतील खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला असून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालिकेकडून सफाई कामगारांना महिन्याला चार म्हणजे वर्षांला साबणाच्या ४८ वडय़ा आणि वर्षांला दोन टॉवेल दिले जातात. एका साबणाच्या वडीची किंमत २० रुपये, तर एका टॉवेलची किंमत ७० रुपये असून या दोन्हीसाठी वर्षांकाठी एका सफाई कामगारावर पालिकेला ११०० रुपये खर्च येतो. दर सहा महिन्यांनी साबण व टॉवेलसाठी सफाई कामगारांच्या बँक खात्यावर ५५० रुपये जमा करण्यात येणार आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये सुमारे ४२ हजारांहून अधिक सफाई कामगार आहेत. त्यामुळे साबण आणि टॉवेलसाठी दरवर्षी ४.६० कोटी रुपये इतका खर्च पालिकेला अपेक्षित आहे.

टीकेला कायमचा पूर्णविराम

पालिका प्रशासनाने सफाई कामगारांना साबण व टॉवेल देण्याऐवजी त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार संघटना आणि नगरसेवकांकडूून केल्या जाणाऱ्या टीकेला कायमचा पूर्णविराम मिळणार आहे.