दक्षिण कोरियाहून मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीचा बाग) आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा रविवारी (दि. २३) मृत्यू झाला. मृत पेंग्विनच्या बदल्यात आणखी एक नवा पेंग्विन मागवण्यात येणार असल्याचे समजते. थायलंडच्या कंपनीकडून आणखी एक पेंग्विन मागवण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे. या पेंग्विनच्या मृत्यूनंतर मात्र शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेकांमध्ये भिडले. याप्रकरणी मनसेने शिवसेनेवर टीका केली तर शिवसेनेनेही या टीकेला प्रत्युत्तर दिले.
सेऊल येथील ‘कोएक्स अॅक्वेरिअम’ मधून गतवर्षी २६ जुलै रोजी उद्यानात आठ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यात तीन नर व पाच माद्यांचा समावेश होता. शीत वातावरणात राहणाऱ्या पेंग्विनना मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेता येणार नाही.. त्यांना मुंबईचे हवामान सोसणार नाही, असे इशारे पेंग्विन आणण्याआधीच देण्यात आले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा पेंग्विन पक्षी मुंबईत आणण्याचा आग्रह होता. नोव्हेंबरमध्ये हे पक्षी प्रदर्शनासाठी खुले करण्याचा मानस होता. पण तत्पूर्वीच रविवारी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. या पेंग्विनच्या मृत्यूनंतर मनसेने टीका केली होती. ये तो होना ही था, या मथळ्याखाली मनसेने पत्रक काढून आदित्य ठाकरेंवर टीका केली. तसेच बालहट्टापायी मुंबईकरांच्या २५ कोटी रुपयांचा चुराडा केला. उरलेल्या पेंग्विन पक्षांना थंड प्रदेशात परत पाठवावे, असा सल्लाही दिला होता.
पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका होत आहे, असा पलटवार करतानाच पेंग्विनपेक्षा स्वत:च्या पक्षाची काळजी करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नाव घेतला लगावला होता.