उत्पन्नाच्या वाटा व खर्चाचे निकष यावरून दोन आठवडे पालिकेचे सभागृह नगरसेवकांनी दणाणून सोडल्यानंतर शुक्रवारी विशेष गोंधळ न होता मतदान घेऊन पालिकेचा २०१५-१६ या वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
नगरसेवकांच्या निधीवाटपातील आरोप-प्रत्यारोप, महापौरांवर कागदी बोळे भिरकावणे, लाल दिवा काढण्याची मागणी, काँग्रेसच्या नगरसेविकांचे निलंबन, नगरसेवकांमधील हाणामारी, महापौरांच्या दालनातील धक्काबुक्की, रात्रीपर्यंत चाललेल्या चर्चा अशा सर्व गोंधळातून तावूनसुलाखून निघालेल्या महानगरपालिकेच्या ३३ हजार ५१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला. या वेळी मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली. ती मान्य करून ९० विरोधी ३४ मतांनी हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील वाढीव निधीचा फायदा केवळ सत्ताधारी नगरसेवकांना मिळणार असल्याचा आरोप करून काँग्रेसने पहिल्या दिवसापासून विरोध करण्यास सुरुवात केली होती. सलग सहा दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेपेक्षा इतर बाबींवरूनच रणकंदन माजले होते. मात्र शुक्रवारी शांततेत मतदान घेऊन अर्थसंकल्प मंजूर झाला.