मुंबई महापालिकेचा २०१७-१८ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीसमोर सादर केला. जकातबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. पारदर्शक कारभार, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर हाच आमचा हेतू आहे, असे मेहता यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात महापालिकेचा आधुनिक कारभारावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात ११ हजार ९११ कोटींनी घट करण्यात आली असून, २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी तब्बल १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा अंदाजित खर्च आहे. विशेष म्हणजे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी १,०९५ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी यात काटकसर करण्यात आली असून, गेल्या वर्षी २८८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबईतील महत्त्वाचा मुद्दा असलेल्या नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोट्यात असलेली मुंबईची जीवनवाहिनी अर्थात ‘बेस्ट’ उपक्रमासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे:

मुंबईतील वाहनतळांची संख्या तीन पटीने वाढवणार, ९२ वरुन ही संख्या २७५ करणार, तीन ठिकाणी भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद

महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणार

राणी बागेच्या विकासासाठी ५०.२५ कोटींची तरतूद

उद्यान खात्यासाठी पुढील वर्षात २९१.८० कोटींची तरतूद

वांद्रे किल्ला क्षेत्रासाठी १ कोटींची तरतूद, वांद्रे तलावाच्या सुशोभिकरणासाठी ३ कोटी

मेडिकल हिस्ट्री, प्राथमिक अहवाल, रुग्णांची नोंदणी आदी माहितीसाठी सॉफ्टवेअर

शालेय विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी अथवा त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल

नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद

मिठी नदीकाठावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभिकरण आदींसाठी २५ कोटी

रोकडरहित व्यवहार आणि एम गव्हर्नन्ससाठी पालिकेच्या ११५ सेवा

महापालिकेच्या रुग्णालयांत नऊ अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग सुरु करणार, २१.५० कोटींची तरतूद

महापालिका रुग्णालयांतील ‘व्हेंटिलेटर्स’ची संख्या ४००पेक्षा जास्त वाढवण्यासाठी ३० कोटी

महापालिकेच्या २८ प्रसुतिगृहांचा दर्जा वाढवण्यासाठी, आधुनिकीकरणासाठी ८.९० कोटी

महापालिका रुग्णालयांत नि:शुल्क निदान सेवा, गोरेगाव पूर्वमध्ये मल्टीस्पेशालिटी क्लिनिक सुरु करणार

डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रियेसाठी, कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी १५० कोटी

येत्या वर्षात मुंबईत ८४ मैदानांचा विकास करणार, २६.८० कोटींची तरतूद

मुंबईतील २० उद्याने/मनोरंजन मैदानांच्या विकासासाठी ७० कोटी, ८ ठिकाणी नवे जलतरण तलाव, कांदिवलीत ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव यासाठी ४५ कोटी

हगणदारीमुक्त मुंबईसाठी तरतूद, सार्वजनिक शौचालयांसाठी ७६ कोटी, महिलांसाठीच्या शौचालयांसाठी भरीव तरतूद नाही, येत्या वर्षांत महिलांसाठी केवळ आठ नवी शौचालये

मुंबई शहराच्या साफसफाईसाठी यांत्रिक झाडू आणणार, २० कोटींची तरतूद