भांडुपमधील वॉर्ड क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटवरून दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भांडुपमधील पोटनिवडणुकीत मुंबईकरांनी भाजपला साथ दिली. त्यासाठी मुंबईकरांचे आभार. पोटनिवडणुकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपने विजय मिळवला. यानिमित्ताने मुंबईकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. भाजपच्या विकासाच्या मुद्द्याला साथ दिली. त्यामुळे आता वेडे कोण ठरले हे सांगा, असा सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या धोरणांची खिल्ली उडवण्यासाठी सोशल मीडियावर ‘विकास पागल हो गया’ हा हॅशटॅग वापरला जात आहे. त्या अनुषंगाने शेलार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. मात्र, या ट्विवटरमध्ये त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये विरोधकांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे आता भाजपच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.