यंदा मुसळधार पावसाने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे दिसत असून त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. मात्र महापालिका म्हणते, मुंबईत केवळ ७८४ खड्डे आहेत. मुंबईकरांना खड्डय़ांमुळे त्रास भोगावा लागत आहे, याकडे महापालिकेचे लक्ष नाही. मात्र अशा प्रकारचा अजब दावा त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाच्या पुनरागमनाने मुंबईकर सुखावले खरे! मात्र या पावसामुळे वाढलेल्या ‘खड्डे’संकटामुळे त्यांच्या सुखात विरजण पडले. मुसळधार पावसात जलमय झालेले सखल भाग आणि पदोपदी रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे नव्या संकटांना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने केले. मात्र तरीही खड्डे निर्माण झाल्याने पालिकेच्या कंत्राटदारांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेने काही खड्डे पावसाळ्यातच बुजविण्यास सुरुवात केली आहे. पावसाने उघडीप करताच पालिकेच्या विभाग कार्यालयातील कामगारांनी काही ठिकाणचे खड्डे बुजविण्याचा सपाटा लावला. मात्र खड्डय़ांवरील ही मलमपट्टी तात्पुरती ठरली. पावसाचे पुनरागमन होताच खड्डय़ात भरलेली डांबरमिश्रित खडी पुन्हा उखडली गेली आणि पुन्हा रस्ता खड्डेमय झाला. पालिकेने मात्र मुंबईत कमी खड्डे असल्याचा दावा केला आहे. मुंबईत ३,५१९ खड्डे पडले, पण त्यापैकी २७३० खड्डे बुजविण्यात आले असून, आता केवळ ७८४ खड्डे बुजवायचे आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे.
संगणक प्रणालीचा बोऱ्या
मोबाइलवरून काढलेले खड्डय़ाचे छायाचित्र संगणक प्रणालीवर उपलब्ध होताच त्याची ४८ तासांत दुरुस्ती करण्याचे आश्वासन महापालिकेने मुंबईकरांना दिले. परंतु या कामाची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील रस्ते विभागातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र हे अधिकारी विभागामध्ये फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे खड्डय़ांचे छायाचित्र संगणक प्रणालीवर उपलब्ध होत नाही.

२,७३० खड्डे बुजविले
आजघडीला मुंबईतील लहान-मोठय़ा रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने खड्डे पडले आहेत. मात्र पालिकेच्या संगणक प्रणालीवर आजघडीला केवळ ३,५१९ खड्डय़ांची नोंद झाली आहे. त्यांपैकी ३,२४६ खड्डय़ांची पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीचे नियोजन केले. तर कंत्राटदारांकडे दुरुस्तीसाठी सोपविलेल्या ३०९९ पैकी २७३० खड्डे बुजविण्यात आले.

श्रावणसरी बरसल्या
श्रावण महिना सुरू झाला आणि रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेही १० ते १५ मिनिटांनी विलंबाने धावत होती. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचीही तारांबळ उडाली होती. तरुणांनी मात्र या ‘श्रावणसरीं’चा मनमुराद आनंद लुटला. मुंबईतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी झाली होती.

पाणी साचल्यास स्कूलबस बंद
मुंबई : यंदा रस्त्यावर पाणी साचल्यास शालेय बसने (स्कूल बस) जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागणार आहे. कारण रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांना चुकवत विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणे जिकिरीचे आहे, असे सांगत रस्त्यांवर पाणी भरल्यास शाळेच्या बसगाडय़ा रस्त्यावर न उतरविण्याचा निर्णय मुंबईतील स्कूल बसचालकांनी घेतला आहे. त्यामुळे अशी वेळ उद्भवल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत नेण्याची वा आणण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, नाही तर शाळेला दांडी मारावी लागेल.