नाले गाळाने भरलेले दिसत असतानाही ७५ टक्के नालेसफाईचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने नाल्यांमधील गाळ नेमका कुठे टाकला आहे, याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या वीस दिवसात नाल्यांमधून अडीच लाख घनमीटर आणि मिठीनदीतून सव्वालाख घनमीटर गाळ काढला गेला आहे. हा गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्यास रोज ट्रकच्या किमान अडीच हजार फेऱ्या माराव्या लागतील. मात्र या फेऱ्यांबाबत गौडबंगाल असून कंत्राटदार पालिकेला व पालिका नागरिकांना फसवत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्याने केला आहे.
नालेसफाईच्या दोन वर्षांच्या कामासाठी पालिकेने यावर्षी २६५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.  पालिका डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने मुंबईबाहेर हा गाळ वाहून नेण्यासाठी पालिकेने तब्बल १०० कोटी रुपये अतिरिक्त मोजले आहेत.  ही सफाई ३१ मे पर्यंत पूर्ण होणे गरजेचे असून गुरुवार, २१ मे पर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र कागदावर सुरू असलेल्या या नालेसफाईबाबत विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांनी शंका उपस्थित केली आहे.
पालिकेने केवळ नाल्यांमधून आतापर्यंत २ लाख ५७ हजार घनमीटर गाळ काढल्याचा दावा केला आहे. प्रत्येक ट्रकमधून आठ घनमीटर गाळ वाहण्याची क्षमता असल्याने हा गाळ मुंबईबाहेर विरार व भिवंडी येथे नेण्यासाठी दररोज सुमारे १६५० फेऱ्या माराव्या लागतील. पालिकेने कंत्राटदाराला ट्रकवर जीपीआरएस यंत्रणा लावण्याची अट घातली असली तरी कंत्राटदार दुचाकी, कार, इतर वाहनांना हे यंत्र लावून फिरवत असल्याचा आरोप आंबेरकर यांनी केला. एक घनमीटर गाळ काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंदाजित खर्च ४०० रुपये असताना पालिकेने हे कंत्राट प्रति घनमीटर गाळासाठी केवळ १७० रुपयांत दिले आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून अपेक्षित काम होत नाही त्यामुळे नालेसफाईच्या कंत्राटाची व कामाची चौकशी करण्याची मागणी आंबेरकर यांनी केली आहे.

नालेसफाईचे कंत्राट
*पूर्व उपनगरे – ७० कोटी रुपये
*पश्चिम उपनगरे – ११० कोटी रुपये
*शहरे – ८० कोटी रुपये