२५ टक्केच नालेसफाई झाल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा आरोप

मुंबई पालिकेने केलेला ८५ टक्के नालेसफाईचा दावा खोडून काढत यंदाच्या पावसाळ्यातही ‘मुंबईची तुंबई’ होणार असल्याचे भाकित मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. मुंबईत केवळ २५ टक्के नालेसफाई झाली असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी नालेसफाईच्या कामांच्या पाहणीअंती केला.

संजय निरुपम यांनी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, कॉग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे, पुष्पा कोळी, राजपती यादव, सुप्रिया मोरे यांच्या समवेत सोमवारी मुंबईतील प्रमुख नाल्यांची पाहणी केली. पालिकेकडून नालेसफाईबाबत करण्यात आलेला दावा निरुपम यांनी खोडून काढला आहे. वडाळ्यातील कोरबा मिठागर आणि गोवंडीमधील रफीक नगर नाल्यांमध्ये सुरु असलेल्या सफाईची पाहणी करण्यात आली. कोरबा मिठागर येथील नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला असल्याने सांडपाण्याचा प्रवाह थांबला असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. मात्र भरतीच्या वेळी खाडीच्या पाण्यासोबत कचराही मोठय़ा प्रमाणावर नाल्यात येतो. त्यामुळे कितीही सफाई केली तरी नाला कचऱ्याने भरतो, अशी रडकथा कंत्राटदाराने ऐकवली. गोवंडीतील रफिक  नगर नाल्यामध्येही कचरा साचलेला दिसत होता. ६०० मीटर लांबीच्या नाल्यात यापूर्वी एकदा सफाई झाली असून १२० ट्रक कचऱ्याचा उपसा करण्यात आला असल्याचे उपस्थित पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

दोन वर्षांपूर्वी नालेसफाईत झालेल्या गरव्यवहार प्रकरणी काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. त्यामुळे यावर्षी कंत्राटदारांनी नालेसफाईकडे पाठ फिरवली. यावर पालिकेने सामाजिक  संस्थाना ४३ टक्के जास्त दराने कंत्राट दिले असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. तसेच नाल्यातून किती गाळ व कचऱ्याचा उपसा आला. शिवाय कोणत्या ठिकाणी तो टाकण्यात आला यावर प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले.