नालेसफाईवरून नगरसेवक आणि मुंबई महापालिकेच्या उपअभियंता यांच्यात झालेल्या वादावादीतून नगरसेवकाने उपअभियंत्यावर हात उगारण्याची घटना बुधवारी दुपारी जी-उत्तर प्रभाग कार्यालयात घडली. उपअभियंत्याने नगरसेवकाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, आपली उपअभियंत्याशी केवळ बाचाबाची झाली असून मारहाण केली नसल्याचा दावा नगरसेवकाने केला आहे.
दादर येथील नगरसेवक राजेश सूर्यवंशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जी-उत्तर प्रभागातील कार्यालयात आले होते, त्यावेळी नालेसफाईच्या कामाविषयी असमाधानी असलेल्या सूर्यवंशी यांनी उपअभियंता प्रीतम वनारसे यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली.
चर्चेचे पर्यवसान बाचाबाचीमध्ये झाले. यावेळी नगरसेवक सूर्यवंशी यांनी आपल्या कानशिलात मारल्याची तक्रार वनारसे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात केली आहे.