मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेने मदतीसाठी काँग्रेसकडे हात पुढे केला असून, भाजपला रोखण्याकरिता शिवसेनेला मदत करावी, असा काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे भाजपने शिवसेनेबाबत थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका घेत असली तरी संख्याबळ जमविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ सदस्य निवडून आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पार्टी, एमआयएम व अपक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ३१ सदस्य असलेल्या काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेकडून काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात संपर्कही साधण्यात आला आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेचा महापौर सहज निवडून येऊ शकतो. भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत गैरहजर किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास जास्तीत जास्त सदस्यांची जमवाजमव करता येईल का, याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे.

शिवसेनेने अपक्ष सदस्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दोन बंडखोर आणि एका अपक्ष नगरसेवकाने शुक्रवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ८७ वर पोहोचले आहे. भाजपचा चार अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला होता.

भाजपला रोखण्याकरिता शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. मात्र तशी खेळी केल्यास मुस्लीम मतांवर परिणाम होईल, अशी भीती काँग्रेसला आहे. बेहरामपाडा या मुस्लीमबहुल प्रभागात शिवसेनेचा मुस्लीम उमेदवार निवडून आला. म्हणजेच मुस्लिमांचा शिवसेनेला मते दिली आहेत मग शिवसेनेला पाठिंबा देण्यात गैर काय, असा सवाल काँग्रेसमध्ये केला जातो. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली.

शिवसेनेने काँग्रेसशी अभद्र युती करू नये, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. युती कायम राहावी, अशी भूमिका पाटील आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आहे. तर नितीन गडकरी यांनी सत्तेसाठी शिवसेना व भाजपने एकत्र यावे, असे मत मांडले आहे. तीन अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गोटात भाजपचे थांबा आणि वाट पाहा शिवसेनेला मदत करण्याचा काँग्रेसमध्ये मतप्रवाह