सुधारित निवृत्तिवेतन अथवा अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळविण्यासाठी घालावे लागणारे खेटे, सुधारित वेतनश्रेणी, पदोन्नती मिळविण्यासाठी होणारी दमछाक, कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात होणारा विलंब या अनेक कारणांमुळे पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळेच अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्कमधील आग विझविताना शहीद झालेले अग्निशामक नितीन इवलेकर यांच्या नातेवाईकांना मिळणारे लाभ पालिकेकडून लेखी स्वरूपात घेण्याची वेळ त्यांच्या पत्नीवर ओढवली. पती शहीद झाला असताना पत्नीने अशी कृती करणे सर्वसामान्यांच्या पचनी पडणारी नाही. मात्र पालिका प्रशासनावरील अविश्वास त्यामागे दडला आहे.
निवृत्ती जवळ आल्यानंतर पालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला रुखरुख लागते ती निवृत्तिवेतनाची. एखादे कागदपत्र मिळाले नाही तर हा विभाग निवृत्तिवेतन अडवणार याची हमखास हमी असल्यामुळे निवृत्तीपूर्वी पाच-सहा महिने आधीच कर्मचारी निवृत्तिवेतन विभागात खेटे घालू लागतात. या विभागाला हवी ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वत:लाच धावपळ करावी लागते. संबंधित खात्यातील आपली कागदपत्रे निवृत्तिवेतन विभागाला मिळाली की नाही याची अधूनमधून खातरजमाही कर्मचाऱ्यांना करावी लागते. पालिकेतील फाइल गहाळ होण्याचे प्रकार नवीन नाहीत. कर्मचाऱ्यांनाही त्याचा चांगलाच अनुभव असतो. त्यामुळे निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी निवृत्तिवेतन विभागात फेरी मारून आपली फाइल आहे ना, याची खात्री करूनच कर्मचारी पालिकेला अखेरचा रामराम ठोकतात.
एखादा कर्मचारी सेवेत असताना मृत्युमुखी पडल्यास त्याची पत्नी अथवा मुलांना पालिकेत नोकरी दिली जाते; परंतु ही नोकरी मिळविण्यासाठी बरीच खटपट करावी लागते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मिनतवाऱ्या करून थकलेले अनेक जण महापौर अथवा आयुक्तांच्या दालनाबाहेर भेटीसाठी तिष्ठत बसलेले असतात. महापौरांनी आदेश देऊनही काम होईलच याची खात्री नाही. पालिका कर्मचारी राजेंद्र महाडिक यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु दीड वर्षांमध्ये अनेक खेटे घालूनही नोकरी न मिळाल्याने त्यांची पत्नी रेणुका महाडिक हिने पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अग्निशमन दलातील जवान उमेश परवते वरिष्ठांच्या आदेशानुसार झाडावर अडकलेल्या कावळ्याला वाचविण्यासाठी दुकानाच्या शटरवर चढला आणि पाय घसरून पडला. गंभीर अवस्थेत त्याला टेम्पोमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. परवतेच्या नातेवाईकांनाही आजपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आणि अशा अनेक घटनांमुळे पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांचाही प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याची टीका कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक करीत आहेत.