पालिकेच्या मालमत्ता विभागातील दुय्यम अभियंता प्रवीण साळगावकर यांना बुधवारी पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यांच्या घोडपदेव येथील शासकीय निवासस्थानाच्या झडतीत पोलिसांना दोन लाख रुपयांची रोकड तर सापडलीच शिवाय उंची मद्याच्या बाटल्या आणि सुमारे दोन लाख रुपये किंमतीची परदेशी घडय़ाळे सापडली.
दादर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या पुनविर्कास प्रकल्पाला न्यायालयाचे आदेश असूनही ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी साळगावकर १३ लाख रुपयांची लाच मागत होते. या बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने त्यांना बुधवारी माटुंगा येथून पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर पथकाने त्यांच्या घोडपदेव येथील शासकीय निवासस्थानावर छापा घातला. यावेळी साळगावकर यांच्या घरातून दोन लाख रुपयांची रोकड, २३ मद्याच्या बाटल्या सापडल्या. राडो, डबिज, पॅरीस, टिसॉट, व्ॉचरॉन, पायगेट, डिओर आदी महागडय़ा परदेशी ब्रँम््रंडची १७ मनगटी घडय़ाळेही घरात सापडली. त्याची किंमत १ लाख ८१ हजार रुपये एवढी आहे. याशिवाय कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथे सदनिकाही आढळून आली आहे. त्यांच्या अन्य मालमत्तेचा शोध सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले