फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळीत कचरा करून मुंबई अस्वच्छ करणाऱ्या मुंबईकरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. त्यामुळे फटाके फोडत अस्वच्छता करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या कामासाठी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असून विभागात अचानक भेट देऊन ते कारवाईचा बडगा उगारणार आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे ध्वनी-वायू प्रदूषण, अस्वच्छता आणि फटाक्यांबाबत जनजागृती असे तीन हेतू साध्य होणार आहेत. मात्र राजकीय पक्षांकडून या निर्णयाला कडाडून विरोध होण्याची चिन्हे आहेत.

दरवर्षी दिवाळीमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणांवर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मरिन ड्राइव्ह, वरळी समुद्र किनारा यासह मुंबईतील आठ ठिकाणी खास फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी मुंबईकर पोहोचतात. पूर्वी मध्यरात्रीनंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू असे. मात्र रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर आणि फटाके वाजविण्यावर न्यायालयाने बंदी घातली. मात्र दिवाळीत आजही मोठय़ा प्रमाणावर फटाके वाजविले जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी मंडळीही मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करीत असतात. यामुळे मुंबईतील ध्वनी-वायू प्रदूषणात भर पडत असून दुसऱ्या दिवशी सकाळी फटाक्यांचा कचरा साफ करण्यासाठी सफाई कामगाराचे कंबरडेच मोडते.

दिवाळीत दर दिवशी मुंबईत फटाक्यांचा सुमारे सव्वाशे ते दीडशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. एकटय़ा मरिन ड्राइव्हवर सहा मेट्रिक टन कचरा गोळा होतो. फटाका फुटल्यानंतर अर्धवट जळलेली सुतळ, कागदांचे कपटे, पुठ्ठा असा सुक्या कचऱ्याचा त्यात समावेश असतो.

हा सर्व कचरा गोळा करुन कचराभूमीत टाकला जातो. हा कचरा ज्वलनशील असून कचराभूमीत टाकल्यानंतर त्यात आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे हा कचरा अत्यंत धोकादायक आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.कचऱ्याबरोबर फटाक्यांमधून निघणारा धूर आणि कानठळ्या बसणारा आवाज यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषणकारी फटाके वाजवू नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र तरीही फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे मुंबईकरांचा कल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता फटाक्यांचा कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील, असे विजय बालमवार यांनी सांगितले.

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. दिवाळीत पालिकेचे कर्मचारी विभागात अचानक फिरून कारवाई करणार आहेत. मात्र दंडात्मक कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याचे ओळखपत्र पाहूनच संबंधितांनी दंड भरावा.

-अजोय मेहता, पालिका आयुक्त