मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद तसेच राम कापसे आणि माजी नगरसेवकाच्या निधनामुळे शोक व्यक्त करून पालिका सभागृहाची सोमवारची बैठक आटोपती घेण्यात आली. त्यामुळे महापौरांनी रस्ते घोटाळ्याबाबत पालिका आयुक्तांना केलेल्या पत्रप्रपंचावरून विरोधकांना शिवसेनेची कोंडी करता आली नाही. मात्र आता येत्या गुरुवारी होणाऱ्या पालिका सभागृहाच्या बैठकीत महापौरांचे अभिनंदन करीत शिवसेनेला लक्ष्य करण्याची मोर्चेबांधणी भाजपसह विरोधकांनी केली आहे. रस्तेबांधणीमध्ये रॅबिट वाहून नेण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्याची नालेसफाईप्रमाणेच चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठविल्याचे उघड झाले होते.  घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्याचे धारिष्टय़ दाखविल्याबद्दल आंबेकर यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या बैठकीमध्ये सादर करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. पण मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद, माजी राज्यपाल राम कापसे आणि माजी नगरसेवक दत्तू कटके यांचे निधन झाल्याने बैठकीत शोक प्रस्तावानंतर सभागृहाची बैठक तहकूब करण्यात आली.