मुंबईतील इमारतींमध्ये बसविलेल्या अग्निशमन यंत्रणेची शासनमान्य परवानाधारक प्राधिकरणामार्फत वर्षांतून दोन वेळा (जानेवारी व जून) तपासणी करून त्याचा अहवाल अग्निशमन दलाच्या स्थानिक कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा अहवाल सादर करण्यात टाळाटाळ करणारा इमारत मालक अथवा गृहनिर्माण संस्थेला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची गंभीर दखल घेत पालिकेने ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’ अन्वये इमारतीमध्ये बसविलेली अग्निशमन यंत्रणा व केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची शासनमान्य परवाना प्राधिकरणांमार्फत दोन वेळा तपासणी करून त्याचे ‘प्रपत्र ब’ अग्निशमन दलाला सादर करणे सक्तीचे केले आहे. इमारत मालक आणि निवासी संस्थांच्या सोयीसाठी पालिकेने http://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ‘प्रपत्र ब’ उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त ३७२ परवाना प्राधिकरणांची यादीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्राधिकरणाकडून उपलब्ध झालेले ‘प्रपत्र ब’ पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधाही पालिकेच्या संकेतस्थळावर आहे. त्यामुळे ‘प्रपत्र ब’ घेऊन अग्निशमन दलाच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
या तपासणीत टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’नुसार नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. इमारत मालकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी वर्षांतून दोन वेळा अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.