मुंबई महापालिकेच्या तिजोरीत घसघशीत भर; अखेरच्या दोन दिवसांत ५० कोटींचा महसूल?

१ जुलै रोजी संपूर्ण देशात एकच ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) लागू होणार असल्याने मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणारा जकात कर बंद होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने अखेरच्या दोन दिवसांमध्ये मुंबईत माल घेऊन येणाऱ्यांकडून जकात वसुलीचा सपाटा लावला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांहून अधिक जकात वसूल करण्यात आली असून अखेरच्या दोन दिवसांमध्ये साधारण ५० ते ५५ कोटी रुपये जकातीपोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतील, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत म्हणून जकातीकडे पाहिले जाते. मात्र देशामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जकात कर बंद होणार आहे. जकात बंद होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने अखेरच्या टप्प्यात जकात वसुलीचा सपाटा लावला आहे. मे ते जून २०१७ या तीन महिन्यांमध्ये पालिकेला जकातीपोटी १५०० रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने करनिर्धारण व संकलन विभाग कामाला लागला होता. मुंबईत माल घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून जकात वसूल करण्याचा सपाटा पालिकेने लावला होता. त्यामुळे १ एप्रिल ते २६ जून या कालावधीत पालिकेच्या तिजोरीत जकातीपोटी सुमारे १७०० कोटी रुपयांची भर पडली आहे.

chart

कच्च्या तेलाची आवक घटल्याचा फटका

मुंबईमध्ये आणण्यात येणाऱ्या कच्च्या तेलामुळे पालिकेला मोठय़ा प्रमाणावर जकात मिळते. गेल्यावर्षी १ ते २२ जून या कालावधीत पालिकेला तब्बल ५१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. परंतु यंदा एवढय़ाच कालावधीत पालिकेला अवघे ४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. कच्च्या तेलाची आवक घटल्याने जकातीवर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.