लाभार्थ्यांना देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने पालिकेची पंचाईत; पालिका अधिकाऱ्यांच्या खिशाला फोडणी

महापालिकेने मोठा गाजावाजा करीत ‘जागतिक पुरुष नसबंदी पंधरवडय़ा’निमित्त १५ दिवस राबविलेल्या पुरुष नसबंदीच्या कार्यक्रमालाही पाचशे-हजाराच्या नोटाबंदीच्या कळा सहन कराव्या लागल्या. नोटाबंदीमुळे नसबंदी करून घेणाऱ्यांना बक्षीसरूपात देण्यात येणारी रक्कम रोख स्वरूपात देणे पालिकेला कठीण बनले होते.  अखेर पुरुष नसबंदीसाठी मिळणारा निधी पालिकेच्या प्रसूतिगृहातील ‘जननी सुरक्षा योजने’च्या खात्यात जमा करून नसबंदी करण्यासाठी पुरुषांना पैसे देण्याचा द्राविडी प्राणायाम पालिकेला करावा लागला. तर काही विभाग कार्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या खिशातील पैसे पुढे करावे लागले. इतके करूनही पुरुषांकडून नसबंदीसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून गेल्या पंधरवडय़ात केवळ १०३ जणांचीच शस्त्रक्रिया करण्यात पालिकेला यश आले आहे.

पालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये २१ नोव्हेंबरपासून पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र गेल्या १५ दिवसांमध्ये केवळ १०३ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतल्या असून नसबंदी करून घेणारे पुरुष व प्रवर्तकांना आतापर्यंत १,७०,०५३ रुपये देण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे ८० टक्क्यांहून अधिक पुरुषांनी केवळ पैसे मिळतात म्हणून ही शस्त्रक्रिया करून घेतल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नसबंदीसाठी पुरुषांना प्रसूतिगृहात घेऊन आल्यानंतर त्याच्या चहा, नाश्ता, जेवण आणि अन्य खर्च प्रवर्तकांनाच करावा लागत आहे. पालिकेकडून मिळणाऱ्या २०० रुपयांतूनच हा खर्च करावा लागत असल्यामुळे फारसे पैसे पदरी पडत नसल्याची व्यथा काही प्रवर्तकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

नसबंदी करणाऱ्या पुरुषांना पालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयातील संबंधित विभागामार्फत पैसे दिले जातात. मात्र पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पुरुष नसबंदीसाठी रोख रक्कम देणे पालिकेला अवघड बनले. त्यामुळे ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयातील या विभागाने पुरुष नसबंदीचा निधी जननी सुरक्षा योजनेच्या खात्यावर जमा केला. नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी प्रसूितगृहात येणाऱ्या पुरुषांना आता या योजनेच्या खात्यातून पैसे काढून देण्यात येत आहेत. मात्र तरीही सुट्टय़ा पैशांचा प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील महिलांना बाळंतपणानंतर या योजनेअंतर्गत ६०० रुपयांचा धनादेश दिला जातो.

काही प्रसूतिगृहांमध्ये नसबंदी करणाऱ्या पुरुषांना या योजनेतील पैसे देण्यात आले. तर नसबंदी करणाऱ्या पुरुषांना देण्यासाठी काही विभाग कार्यालयांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या खिशातील पैसे पुढे करावे लागल्याचे समजते.

योजना काय?

* महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते व कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात जागतिक पुरुष नसबंदी पंधरवडय़ाचे आयोजन केले होते.

* नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषाला पालिकेकडून ११०० रुपये, राज्य सरकारकडून ३५१ रुपये असे एकूण १४५१ रुपये देण्यात येतात.

* नसबंदीनंतर पालिकेकडून संबंधित पुरुषांना आवश्यक ती औषधेही दिली जातात. तर नसबंदी करण्यासाठी पुरुषांना घेऊन येणाऱ्या प्रवर्तकाला मोबदला म्हणून २०० रुपये दिले जातात.

*  एका पुरुषाच्या नसबंदीसाठी एकूण १६५१ रुपये खर्च येतो.