बांधकाम व्यावसायिकाकडून १५ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालिकेच्या तीन अभियंत्यांसह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा लावून अटक केली. एका बांधकाम व्यावसायिकाला दादर येथील इमारतीच्या प्रकल्पासाठी प्राथमिक परवानगीचे आयओडी प्रमाणपत्र पालिकेकडून हवे होते. ते प्रमाणपत्र देण्यासाठी पालिकेच्या ई प्रभागाचे कार्यकारी अभियंता सुनील हरिसिंग राठोड (४५), दुय्यम अभियंता बालाजी बिराजदार (३३), साहाय्यक अभियंता विलास खिल्लारे (३५) यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. या व्यावसायिकाने याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी ई प्रभाग कार्यालयात सापळा लावण्यात आला. लाचेची १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सतीश पालव (वास्तुरचनाकार) आणि नारायण पाटील या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर या तिन्ही अभियंत्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.