अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र कक्ष

एखाद्या परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर १२ तासांच्या आत तेथे स्वच्छता करण्याच्या केंद्र सरकारच्या अटीमुळे मुंबई महापालिकेची चांगलीच तारांबळ उडत आहे. १२ तासांची मुदत न पाळल्यास स्वच्छतेसाठी देण्यात येणारे गुण कमी होण्याच्या भीतीने पालिका प्रशासनाने आता चक्क कचराविषयक तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचा विचार चालवला आहे.

शहरांमधील अस्वच्छतेची तक्रार नागरिकांना करता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू केले आहे. रस्त्याच्या कडेला साठलेला कचऱ्याचा ढीग, गटारातून वाहणारे सांडपाणी, वाहणाऱ्या मलवाहिन्यांबाबत तक्रारी ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून येताच १२ तासांमध्ये त्याचे निवारण करण्याचे बंधन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना घालण्यात आले आहे. मात्र, वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत मुंबईत स्वच्छता केली जात असल्याने या यंत्रणांचा ताळमेळ राखण्यात पालिकेची दमछाक होत आहे. तक्रार केल्यानंतर १२ तासांत तक्रारीचे निवारण होऊ शकले नाही, तर त्या शहराचे गुण कमी होऊन स्वच्छतेमध्ये त्याची पिछेहाट होण्याची शक्यता आहे.

पालिकेतील विविध विभागांमार्फत मुंबईमध्ये स्वच्छता राखली जाते. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांमार्फत रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे झाडलोट करून स्वच्छ केली जातात. सांडपाणी, मलजलाचा निचरा मलवाहिन्यांच्या जाळ्यातून होत असून त्याची दुरुस्ती अथवा त्याबाबतची अन्य कामे मलनिस्सारण विभागामार्फत केली जातात. तसेच छोटे-मोठे नाले, नद्याची सफाई देखभाल विभागाकडून केली जाते. ‘अ‍ॅप’वर येणाऱ्या तक्रारी विविध स्वरूपांच्या असतात. त्यामुळे त्या संबंधित विभागाकडे सादर कराव्या लागत असून त्यानंतर त्यांचे निवारण केले जाते. ‘अ‍ॅप’वर येणाऱ्या तक्रारींचा आढावा एकाच ठिकाणी घेतल्यास त्यांचे निवारण करणे सहज शक्य होईल. त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर स्वच्छता कक्ष स्थापन करण्याचा विचार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली.

कामगिरी अजूनही दस नंबरीच

शहरांच्या स्वच्छता क्रमवारीत मुंबईचा क्रमांक २०१४-१५ मध्ये १५४ वा होता. त्यानंतर सातत्याने राबविलेली स्वच्छता मोहीम, केलेली जनजागृती यामुळे २०१५-१६ मध्ये स्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा १० वा क्रमांक आला. आता आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी ‘अ‍ॅप’वर येणाऱ्या तक्रारींचे १२ तासांच्या आत निवारण करावे लागणार आहे. नागरिक रात्रीच्या वेळी मोठय़ा संख्येने ‘अ‍ॅप’वर तक्रारी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांचे काम तीन पाळ्यांमध्ये सुरू करण्यात आले असून आता रात्रीही स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे, असे विजय बालमवार यांनी सांगितले.

तक्रार निवारणात मागे

केंद्र सरकारचे ‘स्वच्छता’ अ‍ॅप महिन्याभरापूूर्वी कार्यान्वित झाले असून आतापर्यंत २६९ मुंबईकरांनी त्यावर तक्रारी केल्या. यापैकी २१७ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मुंबईकरांनी केलेल्या तक्रारीनुसार १६८ ठिकाणी १२ तासांच्या आत स्वच्छता करण्यात पालिकेला यश आले. मात्र १०१ ठिकाणच्या अस्वच्छतेचे निवारण करण्यास विलंब लागला, तर ५२ तक्रारींचे अद्याप निवारण होऊ शकलेले नाही.