एल्फिन्स्टन, करी रोड, डॉकयार्ड स्थानकांतील नव्या पुलांसाठी जागा देण्यास पालिका तयार

स्थानिकांची व प्रवाशांची मागणी असूनही वर्षांनुवर्षे रखडलेल्या रेल्वे स्थानकांजवळच्या पुलांचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एल्फिन्स्टन, करी रोड आणि डॉकयार्ड येथील अत्यंत अरुंद पुलांचे नव्याने बांधकाम करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने त्यांची जागा देण्याची तयारी दाखवली आहे. पालिका व रेल्वे यांच्या समन्वयाने होणाऱ्या कामांसंदर्भात संबंधित यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात पुलांसोबतच नाल्यांचे रुंदीकरण तसेच रेल्वे हद्दीतील कचऱ्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

बहुतांश वेळा महापालिका आणि रेल्वे हद्दीमुळे नागरी सेवांची अनेक कामे खोळंबतात. रेल्वे स्थानकांजवळील उपनगरांचा पूर्व-पश्चिम भाग जोडणारे पूल हे त्यापैकीच एक. अरुंद पादचारी पुलामुळे मोठी दुर्घटना घडलेल्या एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळचा वाहतुकीचा पूलही अत्यंत अरुंद आहे. दुपदरी असलेल्या या पुलाचे चौपदरीकरण करण्याबाबत पालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी सूचना दिल्या होत्या. मात्र त्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे करी रोड तसेच डॉकयार्ड रेल्वे स्थानकांजवळील पुलांचीही गत आहे. या पुलांसंदर्भात महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा झाली. शहरातील इतर पुलांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असला तरी या तीनही स्थानकांजवळील पुलांना प्राधान्य देण्याचे ठरले आहे. ‘हे पूल रेल्वे रुळांवरून जाणार असल्याने ते रेल्वेकडून बांधले जातील. पुलांचे रुंदीकरण होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जागेची आवश्यकता आहे. यातील जी जागा पालिकेच्या मालकीची असेल ती रेल्वेकडे सुपूर्द करण्यासाठी पावले उचलली जातील,’ असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. मात्र खासगी जागेबाबत रेल्वेला कार्यवाही करावी लागेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वेसंदर्भातील निर्णय दिल्लीवरून घेतले जात असल्याने पूर्वी केवळ संमती घेण्यासाठी वर्षांचा अवधी जात असे. मात्र आता मुंबईच्या पातळीवर निर्णयाचे अधिकार आल्याने तसेच एल्फिन्स्टन दुर्घटनेने तोंड पोळल्याने रेल्वे स्थानकांजवळील पुलांसंदर्भात लवकर अंमलबजावणीची शक्यता आहे.

पुलांसोबतच रेल्वे व पालिका यांच्या हद्दीतील २१ नाल्यांबाबतही सोमवारी चर्चा झाली. रेल्वे हद्दीतून जाणाऱ्या २१ नाल्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. रुळांखालून जात असलेल्या या नाल्यांच्या रुंदीकरणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रेल्वेला काम करावे लागेल. हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे रेल्वेरुळांवरील कचरा कमी करण्याबाबत रेल्वेने पालिकेचे सहकार्य मागितले. तेव्हा रेल्वेहद्दीतील वसाहतींमधील प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्यात येणार असून रुळांवर कचरा न टाकण्याबाबत जनजागृती केली जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.